शिरूर, दि. २३ (अरुणकुमार मोटे) :
शिरूर शहरातील मार्वल इन लॉजिंगमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणानंतर या लॉजिंगच्या कारभारावर संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. तरुणीला नशा आणणारी पांढरी पावडर देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच लॉजिंगमध्ये काही दिवसांपूर्वी मेफेड्रॉन (एमडी) जप्त झाल्याची कारवाई झाल्याने ‘नशेली पावडर आली कुठून?’ आणि ‘या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का?’ याचा तपास होणे अत्यावश्यक ठरले आहे.
या प्रकरणात तक्रारीत पांढऱ्या रंगाची नशा आणणारी पावडर खायला दिल्याचे नमूद आहे. ही पावडर नेमकी कोणत्या अमली पदार्थाची होती, हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. मात्र, नागरिकांमध्ये ती एमडीसदृश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनी केवळ अत्याचाराच्या गुन्ह्यापुरता तपास मर्यादित न ठेवता या पदार्थाचा स्रोत, तो लॉजिंगपर्यंत कसा पोहोचला, कोणी आणला आणि यामागे कोणाचे जाळे आहे, याचा स्वतंत्र तपास करण्याची मागणी होत आहे.
याच लॉजिंगमध्ये काही दिवसांपूर्वी मेफेड्रॉनसदृश अमली पदार्थाच्या व्यवहारावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत नोकरीच्या आमिषाने तरुणीला लॉजिंगमध्ये आणून नशेची पावडर देऊन अत्याचार केल्याचा आरोप समोर आल्याने या दोन्ही घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकाच ठिकाणी अमली पदार्थाशी संबंधित कारवाई वारंवार होत असेल, तर त्या ठिकाणी नेमके काय सुरू आहे? हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
या प्रकरणातील घटनाक्रमातील आणखी एक बाब संशय निर्माण करणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लॉजिंगमध्ये एकाच वेळी अनेक तरुण एका खोलीत एकत्र असताना एकटी तरुणी त्याच लॉजिंगमध्ये कशी पोहोचली? तिची नोंद कोणत्या नावाने झाली? खोली कोणी बुक केली? सीसीटीव्हीमध्ये कोण कोण दिसत आहे? संबंधित वाहन कोणाचे होते? लॉजच्या रजिस्टरमध्ये कोणत्या नोंदी आहेत?
या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून समोर येणे गरजेचे आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि लॉजच्या प्रवेश-निर्गमन नोंदी तपासल्या तर या प्रकरणातील अनेक धागेदोरे समोर येऊ शकतात.
‘
दरम्यान, या लॉजिंगच्या मालकाचा मोठा राजकीय व आर्थिक प्रभाव असल्याची शहरात चर्चा आहे. त्यामुळेच लॉजिंगमध्ये कथितपणे सुरू असलेल्या बेकायदा प्रकारांकडे दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लॉजिंग मालकाची भूमिका, त्याला या घटनांची माहिती होती का, परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची त्याला कल्पना होती का, तसेच लॉजच्या खोल्यांचा वापर अशा गैरप्रकारांसाठी होत असल्याचे आढळल्यास त्याने कोणती कारवाई केली, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
एमडी ड्रग्ज प्रकरणात लॉजिंग मालकाला आरोपी न करण्यासाठी शिरूर पोलिसांनी मोठी आर्थिक तडजोड केल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. आर्थिक व्यवहार, कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही, डिजिटल पुरावे आणि इतर उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केल्यास सत्य समोर येऊ शकते.
कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक विनोद पाटील साहेब या लॉजिंगमध्ये गंभीर गुन्ह्यांचे प्रकार समोर येत असताना संबंधित लॉजिंग मालकावर का गुन्हा दाखल करत नाही.. खाल्लेल्या मिठाला जागत तर नाही ना असा सवाल शिरूरकर आता उपस्थित करत आहे. त्यामुळे आता या मालकाला पाठीशी घालणे बंद करा… अन्यथा यासाठी शिरूर मध्ये मोठे जन आंदोलन उभे करावे लागेल.
तसेच १५ ऑगस्ट रोजी रामलिंग रोडवरील ओमरुद्रा सोसायटी मध्ये तब्बल १२ जणांनी एका महिलेला अमानुष पणे मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. एक राजकीय व्यक्तीच्या संबंधित हे आरोपी असून त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आपल्यावर होत आहे.त्याची पत्रकारांना अद्याप माहिती दिली नाही. आरोपींना अद्याप अटकही केली नाही. मग नक्की शिरूर शहरात चालले तरी काय ?कायदा सुवस्थेची पूर्णपणे वाट लागलेली दिसून येत आहे. पोलिस अधिक साहेब जरा वेळ काढून शिरूर कडे लक्ष द्या नाहीतर बिहार पेक्षाही गंभीर परिस्थिती या शिरूर मध्ये पहावयास मिळेल हे नक्की. शिरूर पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर एमडी ड्रग्ज या लॉजिंग मध्ये अनेक दिवसांपासून विक्री होत असताना शिरूर पोलीस नक्की करतात तरी काय ?असा सवाल उपस्थित होत आहे. जोपर्यंत या मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा असा सुरू राहणार.

