शिरूर, दि. २० (अरुणकुमार मोटे) :
शिरूर शहरातील मार्वल कम्फर्ट (सुरज) लॉजिंगच्या खोलीत तब्बल २० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) विक्रीच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केल्याने शहरातील अंमली पदार्थांच्या काळ्या बाजाराचे धागेदोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पोलिसांनी या कारवाईत २० ग्रॅम एमडीसह सुमारे ९ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मात्र, या कारवाईनंतर आणखी एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.लॉजिंगमध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याचा पोलिसांचा आरोप असेल, तर त्या ठिकाणच्या लॉजिंग मालकाची किंवा व्यवस्थापनाची जबाबदारी काय?
पोलिसांनी दादा धावडे (वय २७, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) आणि अमोल राजाराम पोटावळे (वय ३५, रा. राजापूर, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रूम क्रमांक २०९ मध्ये कारवाई करताना २० ग्रॅम एमडी, १९ रिकाम्या प्लास्टिक पिशव्या, दोन मोबाईल आणि स्कॉर्पिओ कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर शिरूर शहरात लॉजिंग मालकाचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्या मार्फत तब्बल १५ लाख रुपयांची तडजोड झाल्याची चर्चा जोर धरत आहे. मात्र, ‘सूत्रांच्या’ हवाल्याने सुरू असलेल्या या चर्चेमुळे पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जर ही चर्चा खोटी असेल तर पोलिसांनी ती तत्काळ फेटाळून लावावी; आणि जर लॉजिंग व्यवस्थापनाची भूमिका तपासात समोर आली असेल तर त्याची सखोल चौकशी का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी लॉजिंगची खोली वापरली जात असेल, तर तेथे येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची नोंद, सीसीटीव्ही फुटेज, लॉजिंगचे रजिस्टर, संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती आणि व्यवस्थापनाला या प्रकाराची कल्पना होती का, याची तपास यंत्रणेकडून काटेकोर चौकशी होणे गरजेचे आहे.
अमली पदार्थांच्या कारवाईत आरोपी जेरबंद होतात; मात्र त्यांना जागा उपलब्ध करून देणारे किंवा या व्यवहाराची माहिती असूनही दुर्लक्ष करणारे कोणी असेल तर त्यांच्यापर्यंत तपासाची साखळी पोहोचणार का? हा आता शिरूरकरांचा सवाल आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २१(ब), २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे तपास केवळ दोन आरोपींपुरता मर्यादित न ठेवता एमडीचा पुरवठादार, खरेदीदार, वितरणाचे नेटवर्क, आर्थिक व्यवहार आणि लॉजिंगचा वापर कसा झाला याचा छडा लावणे आवश्यक आहे.
शिरूरमध्ये अंमली पदार्थांवरील ही दुसरी धडक कारवाई असल्याने पोलिसांच्या कारवाईचे स्वागत होत असले, तरी अशा पदार्थांची विक्री शहरात नेमकी कुठून आणि कोणाच्या आश्रयाने सुरू आहे, याचा पर्दाफाश होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
कारवाई करणाऱ्या पोलिसांचे कौतुक; पण कारवाईच्या सावलीत कुणाला अभय मिळत असेल तर त्याचीही चौकशी झालीच पाहिजे.
‘१५ लाखांच्या तडजोडी’ची शहरात सुरू असलेल्या या चर्चेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

