टाकळी हाजी | ( साहेबराव लोखंडे)
“संताचिये पायी हा माझा विश्वास…” या जगदगुरु तुकोबाराय यांच्या संतवचनातून संतांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत ह.भ.प. कृष्णा महाराज चव्हाण यांनी भक्ती, नामस्मरण आणि संतसंगतीचे जीवनातील महत्त्व विशद केले. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे सुरू असलेल्या श्री विठ्ठल-रुख्मिणी अखंड हरिनाम सप्ताहातील किर्तनसेवेत ते बोलत होते.
कृष्णा महाराज म्हणाले, संतांच्या चरणी ठेवलेला विश्वास हा माणसाला जीवनातील संकटांवर मात करण्याचे बळ देतो. संतांनी समाजाला समता, बंधुभाव, प्रामाणिकपणा आणि मानवतेचा मार्ग दाखविला. त्यांच्या विचारांचे आचरण केल्यास जीवनाला योग्य दिशा मिळते. केवळ धार्मिक विधी करण्यापेक्षा संतांचे विचार आपल्या आचरणात आणणे हीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, दररोज भजन, कीर्तन, प्रवचन व हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सप्ताहात सहभागी होत आहेत. विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ दिसून येत आहे.
नामस्मरणामुळे मनाला शांती मिळते आणि सकारात्मक विचारांची ऊर्जा निर्माण होते. आजच्या धावपळीच्या जीवनात संतांचे विचार समाजाला योग्य दिशा देणारे आहेत. त्यामुळे तरुण पिढीनेही संत साहित्याचा अभ्यास करून त्यातील मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन कृष्णा महाराज चव्हाण यांनी केले.सप्ताहाच्या आयोजनासाठी ग्रामस्थ, भजनी मंडळे आणि भाविक परिश्रम घेत असून, धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


