- ·
शिरूर, ता. ११ ( अरुणकुमार मोटे ) :
शिरूर शहरालगतच्या जांभळीमळा परिसरात डोंगर फोडून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करून त्याची वाहतूक व विक्री सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. या कथित बेकायदा उत्खननामुळे परिसरातील डोंगररांग, नैसर्गिक भूभाग आणि पर्यावरणाचा ऱ्हास व येथिल परीसरातील रस्त्यांची पुर्णपणे वाट लागली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा परिसरात असून, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईवर दबाव येत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
जांभळीमळा परिसरातील संबंधित गट क्रमांकात मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून मुरूम काढला जात असून, तो विविध वाहनांमधून इतरत्र वाहून नेला जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या उत्खननासाठी आवश्यक शासकीय परवानग्या आहेत का, उत्खननाचे प्रमाण किती आहे, तसेच मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांकडे आवश्यक रॉयल्टी व वाहतूक परवाने आहेत का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
डोंगर फोडला जात असताना प्रशासनाचे दुर्लक्ष?
डोंगर फोडून मोठ्या प्रमाणात मुरूम काढला जात असल्यास त्याचा थेट परिणाम नैसर्गिक जलप्रवाह, मातीची धूप आणि परिसराच्या भौगोलिक रचनेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी मुरूम उत्खननाच्या मूळ ठिकाणाची पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामा करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा असल्याने महसूल विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून उत्खननाची व्याप्ती निश्चित करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यक्ती तसेच उत्खनन व वाहतुकीत सहभागी वाहनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
‘पंचनामा करा, वस्तुस्थिती समोर आणा’
जांभळीमळ्यातील कथित मुरूम उत्खननाबाबत तहसीलदारांकडे लेखी निवेदन देण्यात आले असून, तातडीने महसूल पथक पाठवून प्रत्यक्ष पाहणी व पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली आहे. परवानगी नसताना उत्खनन झाल्याचे आढळल्यास संबंधितांकडून दंड वसूल करण्याबरोबरच शासनाच्या नियमानुसार पुढील कारवाई करणे आवश्यक आहे.
राजकीय दबावाच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी महसूल विभागाने पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष पंचनामा झाल्यानंतरच मुरूम उत्खननाची वस्तुस्थिती, त्यासाठी असलेली परवानगी आणि झालेल्या नुकसानीचे प्रमाण स्पष्ट होणार आहे.
जांभळीमळ्यातील डोंगर उत्खननाच्या तक्रारीची महसूल प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते, प्रत्यक्ष पाहणी कधी केली जाते आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

