
शिरूर च्या जांभळीमळ्यात डोंगर फोडून मुरूमाची ‘बेकायदा’ वाहतूक
पर्यावरणाचा ऱ्हास; पंचनामा करून संबंधितांवर कारवाईची तहसीलदारांकडे मागणी
शिरूर, ता. १० ( वार्ताहर )
: शिरूर शहरालगतच्या जांभळीमळा परिसरात डोंगर फोडून मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन करून त्याची वाहतूक व विक्री सुरू असल्याची तक्रार समोर आली आहे. विनापरवाना सुरू असलेल्या या कथित उत्खननामुळे परिसरातील डोंगररांग, नैसर्गिक भूभाग तसेच सार्वजनिक रस्त्याला धोका निर्माण होत असल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शिरूर तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तहसील कार्यालयाकडे सादर केलेल्या निवेदनानुसार, जांभळीमळा येथील संबंधित गट क्रमांकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर फोंडून डोंगरातील मुरूम काढण्याचे आणि तो विविध वाहनांद्वारे इतरत्र वाहून नेण्याचे काम सुरू आहे.
या कथित डोंगर उत्खननामुळे संपुर्ण परिसराच्या नैसर्गिक रचनेवर परिणाम होण्याची शक्यता असून, पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकार गंभीर असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
“तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात यावा. बेकायदेशीररीत्या मुरूमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित ठिकाणी मुरूम उत्खननासाठी कोणतीही अधिकृत परवानगी आहे का, उत्खननाचे प्रमाण किती आहे आणि वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत का, याची महसूल प्रशासनाकडून तपासणी होणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष पाहणी व पंचनाम्यानंतरच या आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
जांभळीमळा परिसरातील कथित अतिक्रमण, मुरूम उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारीची महसूल प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते, तसेच प्रत्यक्ष पाहणी करून दोष आढळल्यास संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

