शिरूर, दि. २९ (अरुणकुमार मोटे):
शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गंभीर गुन्ह्यांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिहार पेक्षाही गंभीर परिस्थिती शिरूर मध्ये निर्माण झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे.
दिवसाढवळ्या खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, विद्युत रोहित्र चोरी, बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर आणि ड्रग्ज, अवैध धंद्यांच्या वाढत्या घटनांमुळे शिरूरची कायदा-सुव्यवस्था धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. खुणाच्या गुन्ह्यातील आरोपींना रस्त्याने मारहाण करीत त्याचे चित्रिकरण करत ते सोशल मिडीयावर दाखवत पोलिस ऍक्टिव्ह झाल्याचे दाखवून मानवी हक्काचे उल्लंघन ते करत आहे. याबाबत न्यायालयात व मानवी हक्क आयोगात दाद मागणार असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले आहे. तसेच या गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेकांना पोलीस ठाण्यात बोलावून आर्थिक लूट केल्याची चर्चा शिरूरमध्ये चांगलीच रंगल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल हे एका आंदोलनादरम्यान शिरूर मध्ये येऊन गेल्यावर अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई झाल्या. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षकाची बदली झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्याला विनोद पाटलांच्या रूपाने नवीन पोलीस निरीक्षक मिळाले. अवैध धंद्यावर कडक कारवाई होऊन आता हे अवैध धंदे बंद होतील अशी माफक अपेक्षा नागरिकांकडून होती.परंतु तसे न होता उलट अवैध धंदे आता जोमाने सुरू झाले आहेत जणू काही या धंद्यांना वरीष्ठांनी मुकसंमती दिल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात बदल झाल्यानंतर परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. मात्र, नागरिकांच्या म्हणण्यानुसार अवैध धंदे व गुन्हेगारीचे सत्र कायम असल्याने अपेक्षांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे.
दिवसाढवळ्या घडणाऱ्या रक्तरंजित घटनांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. घरफोड्या, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी आणि रोहित्र चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने “गुन्हेगारांना नेमके कोणाचे भय राहिले आहे?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार, ड्रग्स रॅकेट, अवैध धंदे आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा या ढिसाळ कारभाराविरुद्ध पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण यांना सामाजिक कार्यकर्ते निवेदन देऊन याबाबत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (क्रमशः )

