
शिरूर, दि. २८(अरुणकुमार मोटे):
शिरूर तालुक्यात वाढत्या गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, “शिरूर पोलिसांचा गुन्हेगारांवरचा वचक कमी झाला आहे का?” असा सवाल आता शिरूरकरांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खून, खुनाचा प्रयत्न, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, विद्युत रोहित्र चोरी तसेच बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये व अवैध्य धंद्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी शिरूर पोलीस ठाण्यात कर्तव्यदक्ष, धाडसी आणि दबंग पोलीस निरीक्षक नेमावा, ड्रग्स माफिया आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच वाढती गुन्हेगारी आटोक्यात यावी, या मागण्यांसाठी आंदोलन आणि उपोषण केले होते. त्यानंतर अवैध्य धंद्यावर धडक कारवाया करून तत्कालीन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची कार्यकाल पूर्ण झाल्याने बदली झाली आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी शिरूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला.
मात्र, नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण आल्याचे चित्र दिसत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. उलट गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. दिवसाढवळ्या रक्तरंजित घडणारे खून, जीवे मारण्याचे प्रयत्न, घरफोड्या, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, विद्युत रोहित्र चोरी आणि विनापरवाना अग्निशस्त्रांचा वापर या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूर शहर आणि तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये वाढती चिंता व्यक्त होत असून, गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुन्हेगारांचे वाढते धाडस पाहता परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या मते, यापूर्वी शिरूर पोलिस ठाण्यात असणारे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, नारायण सारंगकर आणि संजय जगताप यांच्या कार्यकाळात पोलिसांचा मोठा धाक होता. त्या काळात स्थानिकच नव्हे तर बाहेरील गुन्हेगारही शिरूर परिसरात गुन्हा करण्यापूर्वी अनेकदा विचार करत होते. पोलिसांची तातडीची कारवाई, कठोर अंमलबजावणी आणि गुन्हेगारांवरील प्रभावी नियंत्रण यामुळे कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम असल्याचे नागरिक सांगतात.
आज मात्र परिस्थिती बदलत असल्याची टीका होत असून, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अवैध धंदे, ड्रग्स रॅकेट, शस्त्र बाळगणारे आणि सराईत गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गुन्हेगारांवर पुन्हा एकदा पोलिसांचा धाक निर्माण करणारे, कठोर आणि परिणामकारक नेतृत्व शिरूरला मिळावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

