
भाग-२ | शिरूर डिजिटल विशेष
शिरूर, दि. २३(अरुणकुमार मोटे):
टाकळी हाजी मंडळ कार्यालयातील कथित अनियमितता आणि नागरिकांच्या तक्रारींवर आधारित शिरूर डिजिटल विशेष मालिकेच्या पहिल्या भागानंतर आता नागरिकांकडून आणखी धक्कादायक आरोप समोर येत आहेत. मंडळ अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या कामकाजाबाबत नागरिक आणि शेतकरी उघडपणे नाराजी व्यक्त करत असून, महसुली कामांसाठी ठराविक रकमेची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप अनेकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्ता प्रकरणे, फेरफार अहवाल, विविध महसुली दाखले, खरेदी खताच्या नोंदी, तसेच बैलगाडा शर्यतीच्या परवानगीसाठी आवश्यक असलेल्या अहवालांमध्ये विनाकारण विलंब केला जातो. संबंधित काम वेळेत करून हवे असल्यास पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच पैसे न दिल्याने तक्रार अर्ज, हरकत अर्ज नसतानाही नोंदी फेटाळल्याच्या प्रकार या पोटकुलेने केल्याचे सरपंच दामूआण्णा घोडे यांनी सांगितले आहे
सामाजिक कार्यकर्ते मंगेश दंडवते यांनी असा आरोप केला आहे की, बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक महसुली अहवाल देण्यासाठी संबंधित गावांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेतले गेल्याची माहिती त्यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे, टाकळी हाजी येथील सावकार घोडे यांनीही रस्ता प्रकरणांमध्ये अहवाल देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पैसे देण्यास नकार दिल्यास संबंधित अर्ज किंवा फाईल अनेक दिवस प्रलंबित ठेवली जाते. वारंवार कार्यालयात बोलावणे, नवीन कागदपत्रांची मागणी करणे, “उद्या या, परवा या” अशी उत्तरे देणे, अशा प्रकारे नागरिकांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण नाईलाजाने पैसे देऊन काम करून घेत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने महसूल विभाग पूर्णपणे पारदर्शक करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली, निश्चित कालमर्यादा आणि लोकसेवा हमी कायद्याची अंमलबजावणी केली आहे. मात्र, टाकळी हाजी मंडळ कार्यालयात या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप होत असून, त्यामुळे शासनाच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या सर्व आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची, प्रलंबित प्रकरणांची, तसेच कथित डिजिटल व्यवहारांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांनी सांगितले की, “स्थानिक पातळीवर न्याय मिळाला नाही, तर गावोगावच्या प्रतिनिधींसह मंत्रालयात जाऊन महसूलमंत्र्यांकडे निवेदन देण्यात येईल. भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
दरम्यान, या प्रकरणामुळे महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आरोपांची दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी.अशी मागणीही जोर धरत आहे.

