शिरूर, दि. २० (अरुणकुमार मोटे):
शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याबाबत एका लिलाव प्रक्रियेच्या संदर्भात उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून चौकशीचे आदेश दिल्यानंतर शिरूर तहसील कार्यालयात गेल्या दोन दिवसांपासून भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. तहसील कार्यालयातील कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी आणि महसूल विभागातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत तीव्र नाराजी आणि चिंतेची भावना व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिरूर तालुक्यात तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर बाळासाहेब म्हस्के यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली महसुली कामे जलद गतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. विशेषतः शेतरस्ते, पाणंद रस्ते आणि शिवरस्ते खुले करण्यासाठी त्यांनी सातत्याने मोहीम राबवली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्याचा मार्ग उपलब्ध झाला. या उपक्रमाची जिल्हाभरात दखल घेतली गेली असून विविध स्तरांतून त्यांच्या कामाचे कौतुकही झाले.
याशिवाय कुळकायद्याशी संबंधित प्रकरणे, कलम १५५ अंतर्गत प्रकरणे तसेच इतर अनेक महसुली कामांचा मोठा अनुशेष त्यांनी अल्पावधीत कमी करण्याचा प्रयत्न केला. विविध आंदोलने, उपोषणे आणि नागरिकांच्या तक्रारी संयमाने हाताळून प्रशासकीय पातळीवर अनेक प्रश्न सोडविण्यात त्यांनी पुढाकार घेतल्याची भावना महसूल विभागातील कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिल्यानंतर तहसील कार्यालयात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कर्मचारी, तलाठी व मंडळ अधिकारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याविषयी आत्मीयतेची भावना व्यक्त करत असून, “साहेबांनी आम्हाला नेहमी माणुसकीने वागवले, काम करण्याची प्रेरणा दिली आणि जबाबदारीने काम करण्याचे संस्कार दिले. चौकशीत सत्य समोर येईल आणि ते निर्दोष सिद्ध होतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असले तरी त्या चौकशीचा अंतिम निष्कर्ष अद्याप आलेला नाही. त्यामुळे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर यावे आणि त्यानंतरच पुढील निर्णय व्हावा, अशी अपेक्षा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
- सध्या शिरूर तहसील कार्यालयात नेहमीची प्रशासकीय कामे सुरू असली तरी कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याविषयी असलेली आत्मीयता आणि त्यांच्या कामाविषयीचा विश्वास प्रकर्षाने दिसून येत आहे. चौकशी प्रक्रियेनंतर सत्य समोर येईल आणि न्याय मिळेल, अशीच भावना कार्यालयातील अनेक कर्मचारी व नागरीक व्यक्त करत आहेत.

