बेट भागात चोरट्यांचा धुमाकूळ
पिंपरखेड | ( प्रफुल बोंबे )
शिरूर तालुक्यासह बेट भागात विद्युत ट्रान्सफॉर्मर व केबल चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, चोरट्यांनी आता थेट शेतकऱ्यांच्या जीवनवाहिनीवरच घाला घालण्यास सुरुवात केली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे शनिवारी (दि. २७) पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी १०० एच.पी. क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर निकामी करून त्यातील मौल्यवान तांब्याची कॉइल, ऑइल व इतर धातूंची चोरी केली. याचबरोबर परिसरातील २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे अडीच ते तीन लाख रुपये किमतीच्या विद्युत केबलीही चोरून नेल्या. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री भारनियमन संपल्यानंतर सुमारे साडेअकराच्या सुमारास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. मात्र रात्री दीड वाजल्यानंतर वीज गेली आणि त्यानंतर ती पुन्हा आलीच नाही. सकाळी शेतकरी ट्रान्सफॉर्मरची पाहणी करण्यासाठी गेले असता ट्रान्सफॉर्मर फोडलेला आणि परिसरातील विद्युत केबली गायब असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. याबाबत शेतकरी संदीप बोंबे, प्रशांत बोंबे, दत्तात्रय बोंबे व अलंकार बोंबे यांनी माहिती दिली.
विशेष म्हणजे, चोरट्यांनी चोरी केलेल्या केबली एकाच ठिकाणी नेऊन पूर्णपणे सोलल्याचे दिसून आले. त्यामुळे या चोरीपूर्वी रेकी करण्यात आली असून, ही घटना एखाद्या सराईत आणि संघटित टोळीनेच घडवून आणल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या बेट भागात दुष्काळाची तीव्र झळ बसत आहे. पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने पिके, जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठाच खंडित झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
दरम्यान, टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राच्या कार्यक्षमतेवरही नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या भागात अवैध दारूविक्री, मटका, जुगार अड्डे आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री नियमित गस्त घालण्याची मागणी अनेकदा करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यापूर्वी जांबूत परिसरातही सलग दोन दिवस चोरीचे प्रयत्न झाले होते. तसेच बेट भागात यापूर्वी घडलेल्या चोरी, दरोडे आणि खुनांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरही पोलीस यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेतली नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. परिणामी टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राच्या कामकाजाबाबत लेखी तक्रार करणार असल्याची माहिती काही सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांचा थेट सवाल
“अवैध धंदे सुरू आहेत, चोऱ्या वाढत आहेत, रात्री गस्त नाही, वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल पिंपरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


