तीन वेगवेगळ्या कारवायांत लाखोंचा मुद्देमाल जप्त; चार आरोपींवर गुन्हे दाखल
शिरूर | शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व्यवसायाविरोधात शनिवारी (दि. १६) विशेष मोहीम राबवून पोलिसांनी साबळेवाडी, कवठे येमाई व मलठण येथे धडक कारवाया करत सव्वा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई टाकळी हाजी हद्दीतील साबळेवाडी परिसरातील घोडनदी पात्रालगतच्या काटवणात करण्यात आली. येथे सुरेश चोरे व संतोष मुंजाळ (रा. डोंगरगण, ता. शिरूर) हे गावठी हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकून गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन, तयार दारू, केमिकलयुक्त ताडी तसेच इतर साहित्य असा मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर कवठे येमाई येथे किनारा हॉटेलसमोर सुभाष पांडुरंग मुंजाळ हा सदाशिव घोडे यांच्या सांगण्यावरून देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई मलठण हद्दीतील आर. जी. रेस्टो परमिटरूम बियर बार शेजारील तिरंगा बिर्याणी हॉटेलमधील एका खोलीत करण्यात आली. येथे सदाशिव रावजी घोडे हा देशी दारूचा अवैध साठा ठेवून विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी विविध कंपनीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करत कारवाई केली. या प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या तीनही कारवायांमध्ये सुरेश चोरे, संतोष मुंजाळ, सदाशिव रावजी घोडे व सुभाष पांडुरंग मुंजाळ या चार आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष पथक नेमून केली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग, पोलीस हवालदार बी. के. भवर, प्रविण सांगळे, नितीन सुद्रिक तसेच पोलीस शिपाई गणेश गोसावी यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा शिरूर पोलिसांनी दिला असून नागरिकांनी परिसरातील कोणत्याही अवैध धंद्याची माहिती मिळताच तत्काळ पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यानी केले आहे.


