
शिरूर, दि. १५ ( अरुणकुमार मोटे) :
शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या एका २६ वर्षीय नातवाने आपल्या ८४ वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवारी (दि. १५) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शिरूर पोलिसांनी आरोपी नातवाला अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे.
दशरथ यशवंत राऊत (वय ८४, रा. बाभुळसर बुद्रुक, ता. शिरूर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर सोमनाथ बाळासाहेब राऊत (वय २६) या नातवाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत दशरथ राऊत यांचे पुत्र दुर्योधन दशरथ राऊत यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास राऊत कुटुंबाच्या राहत्या घरात ही घटना घडली. दशरथ राऊत हे नातू सोमनाथ याला शेतातील कामांबाबत सूचना देत होते. मात्र, या कारणावरून सोमनाथ संतापला. रागाच्या भरात त्याने घरातील लोखंडी गज उचलून आजोबांच्या डोक्यावर व पाठीवर जोरदार वार केले.
अचानक झालेल्या या हल्ल्यात दशरथ राऊत गंभीर जखमी झाले. डोक्यावर व शरीराच्या विविध भागांवर गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वृद्ध आजोबांचा स्वतःच्या नातवाकडून झालेला खून समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. या घटनेमुळे बाभुळसर बुद्रुक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हा घडल्यानंतर काही तासांतच आरोपी सोमनाथ राऊत याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.कौटुंबिक नात्यांना काळिमा फासणारी घटना कौटुंबिक वाद आणि क्षणिक रागातून घडलेल्या या घटनेने नातेसंबंधांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शेतातील काम करण्यास सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका नातवाने आपल्या वृद्ध आजोबांचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसर हादरला असून, गावकऱ्यांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

