शिरूर, दि. १२ (अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यासह बेट भागात पुन्हा एकदा अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून दारू, जुगार आणि शिरूर शहरात मटका, ड्रग्ज व्यवसाय अजूनही खुलेआम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून अधूनमधून होणाऱ्या थातूरमातूर कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांमध्ये कोणतीही भीती राहिलेली नसून कारवाईनंतर काही तासांतच हे धंदे पुन्हा सुरू होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. बेल्हा – जेजूरी रस्त्यावरील चांडोह हद्दीतील एका ढाब्यावर ४ वेळा कारवाई होऊनही तेथे दारुविक्री मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. नागरीकांनी तक्रार केल्या नंतर पोलिस तक्रारदारांची नावे ढाबा चालकांना सांगत आहे. अशी चर्चा सुरु आहे.
बेट भागातील कवठे येमाई, जांबूत, मलठण, टाकळी हाजी, चांडोह, पिंपरखेड, वडनेर, आमदाबाद या ठिकाणी असण्याऱ्या धाब्यांवर नियमांना हरताळ फासत सर्रास मद्यविक्री सुरू असल्याचा आरोप होत आहे. दोन अधिकारी असूनही कारवाई होत नाही.ग्रामीण भागातील तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत असताना संबंधित यंत्रणा मात्र केवळ कागदी घोडे नाचवत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. शिरूर पोलीस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी दूरक्षेत्राला आलेले राहुल भागवत व गोविंद खटींग हे दोन नवीन पोलीस उपनिरीक्षक या अवैध धंद्यांना तातडीने आळा घालणार की अभय देणार? हे येणाऱ्या कालखंडात समजणारच आहे.
यापुर्वीचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी बदलीपूर्वी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहिम राबवून अनेक ठिकाणी कारवाया केल्या होत्या. त्यामुळे काही काळ अवैध व्यवसायांना लगाम बसल्याचे दिसून आले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर पुन्हा एकदा परिस्थिती ‘जैसे थे’ झाल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे मलठण परिसरातील सोनेसांगवी रोडतगत शेड उभारून मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या ठिकाणी दिवस-रात्र लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप होत असून संबंधितांवर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अवैध दारू विक्री, जुगार आणि मटका यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असताना पोलिस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. नव्याने जबाबदारी स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांसमोर अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आता बेट भागासह संपूर्ण शिरूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई होणार की पुन्हा ‘लक्ष्मी दर्शनामुळे’ हे धंदे बिनधास्त सुरूच राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चौकट : “कारवाईची प्रतीक्षा”…
मलठण येथील कथित जुगार अड्डा, धाब्यांवरील अवैध मद्यविक्री आणि शिरूर शहरातील मटका व्यवसाय याबाबत पोलिसांकडून व्यापक मोहीम राबवून कठोर कारवाईची नागरिक अपेक्षा व्यक्त करीत आहेत. आगामी काळात शिरूर पोलिसांची भूमिका काय राहते, यावरच अवैध धंदे थांबणार की आणखी फोफावणार हे ठरणार आहे.

