किमान वेतनवाढीबाबत लवकरच दिलासा मिळेल : गणेशभाऊ ताठे
शिरूर | (साहेबराव लोखंडे)
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्न, अडचणी आणि न्याय्य मागण्यांबाबत आयोजित करण्यात आलेला मार्गदर्शन मेळावा रामलिंग (ता. शिरूर) येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या या मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जाचे गणेशभाऊ ताठे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. किमान वेतनवाढीबाबत सकारात्मक संकेत देत कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांनी वेतनवाढ, सेवा सुरक्षितता, १० टक्के रिक्त पदांची भरती, वेतनातील दिरंगाई तसेच कोरोना काळातील प्रलंबित प्रोत्साहन भत्ता यांसारखे प्रश्न जिल्हा परिषद सभागृहात प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पंचायत समितीच्या सभापती स्वातीताई घावटे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी हे ग्रामीण प्रशासनाचे आधारस्तंभ असल्याचे सांगत त्यांच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी खंबीरपणे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. तसेच शासन स्तरावरही या प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याची तयारी दर्शविली.
मेळाव्यात कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या, अनुभव व अपेक्षा मांडल्या. मान्यवरांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी व सन्मानासाठीचा लढा अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळाले असून त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर सकारात्मक दबाव निर्माण होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. ज्ञानोबा घोणे यांनी केले, तर सूत्रसंचालन लक्ष्मण मांढरे यांनी केले. राहुल तावरे, नवनाथ डाळिंबकर, गणेश वाळुंजकर व सुनिता लांडगे यांनी कामगारांचे प्रश्न मांडले. शशिकांत सदाफुले यांनी आभार मानले.
यावेळी तुळशीदास दुंडे, वाल्मीक रासकर, शिवाजी जाधव, मंगेश आबनावे, विष्णू गोसावी, गणेश राऊत, गणेश भुजबळ, कैलास पाडळे, अनिल सांगडे, राजेंद्र वाव्हळ, संतोष साखरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


