शिरूर, दि. २०(अरुणकुमार मोटे)
टाकळी हाजी औटपोस्टातील पोलिस अधिकारी खाल्लेल्या मिठाला प्रामाणिकपणे जागत असल्यामुळे ‘ अवैध धंदयावाले जोमात अन्
नागरीक कोमात’ अशी अवस्था झाली आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून, ” जुगार तस्कर,दारू तस्कर आणि काही पोलिस अधिकाऱ्यांचे नेमके कोणते संबंध आहेत?” असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
दि. १९ रोजी मलठण येथे नागरीकांनी तक्रार केल्यानंतर जुगार व दारु विक्रेत्या वर कारवाई साठी टाकळी हाजी औटपोस्ट चे एक आधिकारी आले परंतु खाल्लेल्या मीठाला जागत एकामार्फत दहा हजार घेतलेल्या अवैध जुगार वाल्याला माहीती देत जुगार बंद करायला लावला.व तेथे काहीच सुरु नसल्याचा देखावा केला. मग दोन तासापूर्वी तेथे काय सुरु होते ? हा प्रश्न तेथील नागरीक उपस्थित करत आहे.टाकळीहाजी, शिरूर व वरीष्ठ आधिकारी असे मिळून तब्बल दीड लाख रुपये महीना देत असल्याचे जुगार मालक बिनधास्तपणे सांगत आहे. ते वेळ आल्यावर पुराव्यानिशी सिद्ध करूच.तसेच दोन दारुविक्रेत्यांनाही खाल्लेल्या मिठाला जागत सोडून देण्यात आले.
बेट भागातील अनेक गावांमध्ये हातभट्टी दारू, गावठी दारू आणि बाहेरून आणलेल्या अवैध मद्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत दारूच्या पार्ट्या रंगत असून, त्यामुळे गुन्हेगारी, भांडणे, महिलांची छेडछाड आणि अपघातांच्या घटनांमध्ये यामुळे वाढ होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
विशेष म्हणजे, अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती संबंधित यंत्रणांना असतानाही केवळ खालेल्या मिठाला जागण्या साठी त्यांच्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. एखादी कारवाई झालीच तर ती केवळ दिखाऊ स्वरूपाची असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढत असून, कायद्याचा धाक मात्र संपल्याचे चित्र आहे.
चार दिवसापुर्वी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिरूर येथे बेट भागातील अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणताही कारवाई केली नाही.याबाबत वळसे पाटील साहेब काय भुमिका घेतात हेही पाहणे महत्वाचे आहे.
बेट भागातील युवक व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. गावागावात सुरू असलेल्या या अवैध दारू व्यवसायामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. तरीही संबंधित यंत्रणा गंभीरपणे कारवाई करताना दिसत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नागरिकांचा सवाल
“अवैध दारू विक्री, जुगार इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती नाही, हे मानणे कठीण आहे. मग या धंद्यांवर कठोर कारवाई का होत नाही?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
बेट भागातील अवैध दारू तस्करीचे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून विशेष मोहीम राबवावी, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि या धंद्यांना पाठीशी घालणाऱ्यांचाही शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“बेट भागातील अवैध दारूचा खेळ नेमका कोणत्या आधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सुरू आहे आणि तो कधी थांबणार?” हा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेच्या मनात घोंगावत आहे.( क्रमशः )

