
शिरूर दि. ३ : ( अरुणकुमार मोटे)
माहिती अधिकार, लोकसेवा हक्क, रुग्ण हक्क, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती, महिला व बालक संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजहिताचे कार्य करणारे डिंग्रजवाडी (कोरेगाव भीमा), ता. शिरूर येथील यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था, पुणेचे संस्थापक अध्यक्ष खंडुआण्णा भरत गव्हाणे यांना राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या गौरवामुळे शिरूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
माणूस परिवार महाराष्ट्र राज्यच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील सभागृहात २ जून रोजी झालेल्या या कार्यक्रमास राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी, उद्योजक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. पुणे बार असोसिएशनचे सदस्य अॅड. सूर्यकांत नाळे यांच्या हस्ते खंडुआण्णा गव्हाणे यांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
माणूस परिवार महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष दुष्यंतराजे जगताप यांनी खंडुआण्णा गव्हाणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. समाजातील वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्कांविषयी जागृत करण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची विशेष नोंद घेण्यात आली.
खंडुआण्णा गव्हाणे यांनी यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून माहिती अधिकार कायदा, लोकसेवा हक्क अधिनियम, अभिलेख हक्क, रुग्ण हक्क यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करण्याचे काम सातत्याने केले आहे. नागरिकांना शासनाच्या विविध कार्यालयांतील प्रक्रियांची माहिती मिळावी, त्यांच्या न्याय्य मागण्यांना योग्य दिशा मिळावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी त्यांनी अनेक प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शन सत्रे आणि जनजागृती मोहिमा राबविल्या आहेत.
याशिवाय भ्रष्टाचारविरोधी अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्राहक संरक्षण, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, महिला व बालक संरक्षण, कायदेविषयक मार्गदर्शन, समुपदेशन, सामाजिक सलोखा आणि लोककल्याणकारी उपक्रम यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. अनेक सामाजिक प्रश्नांवर प्रशासनाशी पाठपुरावा करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना खंडुआण्णा गव्हाणे म्हणाले, “उत्तम चारित्र्य, ज्ञान, वेळेचे योग्य नियोजन, सत्कर्म, सहकार्य, प्रामाणिकता, समाजकार्य आणि समुपदेशन या गुणांची जोपासना केल्याने व्यक्ती समाजात प्रतिष्ठा प्राप्त करते. समाजासाठी केलेले कार्य हेच खरे समाधान देणारे असते. हा पुरस्कार माझा नसून यशोदा संस्थेच्या सर्व सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, कायदेतज्ज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि समाजहितासाठी झटणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याचा आहे.”
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था कार्यरत असून, समाजातील विविध घटकांना न्याय, हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी संस्था सातत्याने काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून प्रेस मीडिया, टीव्ही मीडिया आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने अनेक लोकहिताचे उपक्रम राबविले जात आहेत.
खंडुआण्णा गव्हाणे आणि यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्थेला यापूर्वीही विविध सामाजिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. मात्र राज्यस्तरीय ‘समाजभूषण पुरस्कार २०२६’ हा त्यांच्या कार्याचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

