शिरूर दि. ०१ ( अरुणकुमार मोटे)

: शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर सोमवार दि. ०१ रोजी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान अक्षरशः गोळीबाराच्या आवाजाने दणाणून गेला. भरधाव वाहनाला धडक देऊन अडवण्यात आले आणि त्यानंतर झालेल्या थरारक गोळीबारात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल काळे (वय ३१, रा. बाबुराव नगर, शिरूर) याचा घटनास्थळी मृत्यू झाला असून केदार झाडगे (रा. कुंभार आळी, शिरूर) हा गंभीर जखमी झाला आहे. सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विशाल काळे आणि केदार झाडगे हे वाहनातून जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीला ठोकर देऊन अडवले. त्यानंतर सनी यादव (रा. बकोरी फाटा, वाघोली) व त्याच्या अन्य ५ ते ६ साथीदारांनी अचानक हल्ला चढवत गोळीबार केला. या हल्ल्यात विशाल काळे याला गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर केदार झाडगे गंभीर जखमी झाला. जखमीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
प्राथमिक तपासात हा हल्ला पैशांच्या व्यवहारातील जुन्या वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मयत आणि आरोपी हे दोघेही विविध गुन्ह्यांमध्ये नोंद असलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. करडे घाट परिसराला पोलिसांनी छावणीचे स्वरूप दिले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून पोलिसांनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.
या थरारक हत्याकांडामुळे शिरूर तालुक्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरदिवसा रस्त्यावर वाहन अडवून गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागील नेमके कारण, आरोपींची संख्या आणि वापरण्यात आलेल्या शस्त्रांबाबतचा तपशील पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, करडे घाटातील या रक्तरंजित गोळीबाराने शिरूर तालुका हादरला असून, पोलिसांसमोर आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

