- शिरूर दि. २९ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे कार्यालयात सध्या १ गुंठा, ५ गुंठे, ६ गुंठे अशा अत्यल्प क्षेत्रफळाच्या जमिनींची मोठ्या प्रमाणावर सामाईक खरेदीखत नोंदणी होत असल्याने गुंठेवारी प्रकरणात मोठ्या घोटाळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी निळवादळ संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दीपिका ताई भालेराव यांनी केली आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी शेती जमिनींचे नियमबाह्य तुकडे करून त्यांची सामाईक खरेदीखत करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे १ ते ६ गुंठ्यांच्या जमिनींची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असतानाही संबंधित महसूल विभागातील तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडून या व्यवहारांची अधिकृत नोंद घेतली जात नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दीपिका ताई भालेराव यांनी सांगितले की, सहदुय्यम निबंधक कार्यालयात होणाऱ्या या खरेदीखत व्यवहारांमुळे पुढे सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्याच्या वेळी नागरिकांची मोठी अडवणूक केली जाते. तलाठी व मंडल अधिकारी विविध कारणे सांगून नोंदी प्रलंबित ठेवतात. परिणामी नागरिकांना वारंवार कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागत असून काही ठिकाणी आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी देखील वाढत आहेत.
गुंठेवारीच्या नावाखाली शेतीचे तुकडे करून नियमबाह्य व्यवहारांना खतपाणी घातले जात असल्याचा आरोप करत भालेराव यांनी या प्रकरणात महसूल विभाग, निबंधक कार्यालय तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशीही मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकारामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

