शिरूर दि.१९ ( अरुणकुमार मोटे)
: शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री, गावठी हातभट्टी याविरोधात शिरूर पोलिसांनी सलग धडक कारवाया करत आठ गुन्हे दाखल केले असून तब्बल दीड लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली चांडोह, डोंगरगण, टाकळी हाजी, मलठण, कवठे येमाई आणि आमदाबाद परिसरात विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत गावठी हातभट्टी दारू, विदेशी दारू, तसेच जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले.
मौजे टाकळी हाजी येथील साबळेवाडी परिसरातील घोड नदी पात्रालगतच्या काटवनात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सुरेश चोरे व संतोष मुजाळ या आरोपींकडून तब्बल २२०० लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे व जळके रसायन, ३५० लिटर तयार दारू, केमिकलयुक्त ताडी व भट्टी साहित्य असा एकूण १ लाख १३ हजार २७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी उसाच्या शेतात पळून गेले. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ४४०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
मलठण गावातील तिरंगा बिर्याणी हॉटेलच्या वरच्या खोलीतून सदाशिव रावजी घोडे याच्याकडून ८ हजार २४० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. तर मलठण येथील ओंकार हॉटेलसमोर नितीन एकनाथ चोरे याच्याकडून क्लासिक गोल्ड, स्पेशल व्हिस्की व टेंगो पंच देशी दारू असा ६ हजार ३०० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
कवठे येमाई परिसरातही पोलिसांनी धडक कारवाई केली. किनारा हॉटेलसमोरून सुभाष मुजाळ व सदाशिव घोडे यांच्याकडून बियर व देशी दारूच्या बाटल्या मिळून ४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच रानवारा हॉटेलसमोर अविनाश प्रकाश उचाळे याच्याकडून विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या असा ७ हजार ५१५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. हॉटेल मराठा खानवळ परिसरात लहू सखाराम वागदरे याच्याकडून ६ हजार ५०० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली.
चांडोह परिसरात लाखनगाव पुलाजवळील काटवनात देविदास ऊर्फ रामदास नानाभाऊ शिंदे याच्यावर हातभट्टी विक्री प्रकरणी दोनच दिवसात तब्बल तीनदा स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.
आमदाबाद गावातही पोलिसांनी कारवाई करत अक्षय किसन साळवे याच्याकडून ५ लिटर गावठी दारूसह १ हजार रुपयांचा माल जप्त केला. तसेच परशुराम वसंत पवार याच्याकडून ३५ लिटर गावठी हातभट्टी दारूसह ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, डोंगरगण येथे भैरवनाथ पशुखाद्य दुकानासमोर सुरू असलेल्या रम्मी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व कारवायांमध्ये पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार व पोलीस शिपायांच्या पथकांनी सहभाग घेतला आहे. यापुढेही अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले आहे

