शिरूर दि. ०५ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील जांबूत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय जोरी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर सोमवारी झालेल्या विशेष सभेत बहुमताने ठराव मंजूर झाल्याने गावाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.जांबुत ग्रामपंचायत स्थापनेपासून पहिल्यांदा अविश्वास ठराव झाल्याची घटना घडली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात दि. ०४ रोजी सकाळी ११ वाजता ही विशेष सभा घेण्यात आली. सभेसाठी संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्या कारभाराबाबत काही सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. विकासकामे, प्रशासकीय निर्णय प्रक्रिया, सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच ग्रामपंचायतीच्या कामकाजातील काही मुद्द्यांवरून सदस्यांमध्ये मतभेद वाढले होते. याच पार्श्वभूमीवर सरपंचांविरोधात नियमानुसार अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.
या अविश्वास ठरावावर चर्चा व मतदान घेण्याकरीता अध्याशी अधिकारी तथा शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी बोलवलेल्या विशेष सभा करता एक ते नऊ ग्रामपंचायत सदस्य हजर झाल्यानंतर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या सुरुवातीला अविश्वास ठरावाचा विषय उपस्थित करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सदस्यांनी आपापली मते मांडत ठरावावर सविस्तर चर्चा केली. काही सदस्यांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत प्रशासनात पारदर्शकता नसल्याचा आरोप केला, तर काही सदस्यांनी गावाच्या विकासकामांबाबत असमाधान व्यक्त केले.
यानंतर नियमानुसार मतदान प्रक्रिया पार पडली. सभेत उपस्थित बहुसंख्य सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने सरपंचांविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयाची नोंद अधिकृत इतिवृत्तामध्ये करण्यात आली असून उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या.
अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीतील सत्तासमीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील नियमानुसार प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून नवीन नेतृत्व निवडीसंदर्भात हालचाली सुरू होणार असल्याची चर्चा गावात सुरू आहे.
या घडामोडीमुळे संबंधित गावाच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून पुढील सरपंचपदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता या ग्रामपंचायतीतील पुढील राजकीय घडामोडींवर लागले आहे.

