शिरूर, दि. ३० ( अरुणकुमार मोटे)
द्रुतगती चलन भरूनही महिनाभरात मोजणी होणे अपेक्षित असताना शिरूर तालुक्यात सहा-सहा महिने उलटूनही मोजणी होत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर थेट चंद्रशेखर बावनकुळे यांना सवाल उपस्थित करत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
नियमानुसार द्रुतगती चलनाच्या प्रकरणात एका महिन्यात मोजणी पूर्ण होणे आवश्यक आहे, तर नियमित चलनासाठी तीन महिन्यांची मर्यादा आहे. मात्र शिरूर तालुक्यात वर्ष उलटूनही अनेक शेतकऱ्यांना मोजण्या झाल्या नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. परिणामी शेतकऱ्यांना भुमी अभिलेख कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
शेतकऱ्यांचा थेट सवाल असा आहे की, “द्रुतगती चलन भरूनही काम वेळेत होत नसेल, तर अशा योजनेचा फायदा काय? पुण्यात एसी केबिनमध्ये बसून निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव आहे का?”
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, काही मोजक्याच प्रकरणांमध्ये मोजणीच्या तारखा बदलून तातडीने कामे केली जातात, तर सर्वसामान्य शेतकरी मात्र प्रतीक्षेतच राहतो. या संशयास्पद प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पूर्वीप्रमाणे मोजणी प्रक्रियेत बदल करण्याचे अधिकार तालुका स्तरीय उपअधिक्षकांना दिल्यास कामे जलद गतीने होऊ शकतात, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. सध्या सर्व निर्णय केंद्रीकृत असल्याने विलंब वाढत असल्याची टीका होत आहे.
शिरूर तालुक्यातील प्रलंबित मोजण्या तातडीने पूर्ण न केल्यास आणि द्रुतगती चलनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्यास शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तेजस यादव यांनी दिला आहे.
एकूणच, शेतकऱ्यांच्या मुलभुत प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने शिरूर तालुक्यात नाराजीचा सूर वाढत असून, आता महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः लक्ष घालून शिरूर तालुक्यातील परिस्थिती सुधारावी, अशी जोरदार मागणी होत आहे.( क्रमशः )

