रांजणगाव गणपती : (साहेबराव लोखंडे)
रांजणगाव गणपती परिसरात वाढत्या वाहनांच्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काळ्या काचा लावलेली तसेच बिगर नंबर प्लेट असलेल्या वाहनांविरोधात धडक मोहीम राबवली. या कारवाईत एकूण २८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सदर मोहीम ही परिसरात संशयास्पद हालचाली रोखण्यासाठी राबविण्यात आली. अशा प्रकारची वाहने अवैध धंदे किंवा इतर अनैतिक कृत्यांसाठी वापरली जात असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कडक कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, मारुती पासलकर, अविनाश थोरात, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, रमेश शिंदे तसेच पोलीस अंमलदार सुरेश वळेकर, रामेश्वर आव्हाड, आकाश सवाने, अमोल रासकर, पंडित मुंडे, राम वाहेकर यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, अशा प्रकारच्या कारवाया पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्पष्ट केले आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.


