शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू
शिरूर दि.१७ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर परिस्थितीकडे शासन व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळुंज यांनी बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. बुधवार (ता. १५) पासून तहसीलदार कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शहरासह तालुक्यात चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. या आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू आहे.
शहरात एमडी (मेफेड्रोन) सारख्या घातक अमली पदार्थांचा वाढता विळखा तरुणाईला ग्रासत असून, हातभट्टी दारूचे वाढते प्रमाण, अवैध धंदे, जुगार, मटका, चोरीच्या घटना, दादागिरी व भाईगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
सत्याग्रह सुरू करण्यापूर्वी नीलेश वाळुंज यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शिरूरमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची सविस्तर माहिती देत आंदोलनाबाबत चर्चा केली. हजारे यांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळत आहे.
या आंदोलनातून काही महत्त्वाच्या मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये “एक गाव, एक पोलिस अंमलदार” ही योजना प्रभावीपणे राबवावी, शिरूरसाठी कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) व शिरूर, शिक्रापूर पोलिस ठाण्याला कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षकांची नेमणूक करावी, शिरूर शहरासाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करावे, अण्णापूर गाव टाकळी हाजी दूरक्षेत्राऐवजी शिरूर पोलिस ठाण्याला जोडावे, तसेच शिरूर पोलिस ठाण्यासमोर झालेल्या राड्याची सखोल चौकशी करावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.
या सत्याग्रहाला स्थानिक नागरिकांकडून हळूहळू पाठिंबा वाढत असून, विविध सामाजिक संघटना व कार्यकर्तेही आंदोलनस्थळी भेट देत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नीलेश वाळुंज यांनी दिला आहे. या आंदोलनाला शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के व शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी भेटी दिल्या आहेत. तसेच अनेक सामाजिक संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, शिरूरमधील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि प्रत्यक्षात कितपत उपाययोजना करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

