शिरूर, ता. १४ (अरूणकुमार मोटे) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’च्या धर्तीवर मलठण (ता. शिरूर) महसूल मंडळांतर्गत कवठे येमाई येथे शुक्रवारी (दि. १७) भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अष्टविनायक महामार्गावरील माहेश्वरी गार्डन मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या शिबिरामुळे ग्रामस्थांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.
मलठण मंडल अधिकारी विजय फलके यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घ्यावी व प्रत्यक्ष लाभ मिळवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात महसूल विभागाकडून सातबारा दुरुस्ती, शेतरस्ते, शिवपाणंद रस्ते, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, संजय गांधी निराधार योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती आदी सेवांबद्दल मार्गदर्शन व समस्यांचा निपटारा केला जाणार आहे. त्याचबरोबर पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे.
कृषी, सार्वजनिक बांधकाम, चासकमान प्रकल्प, पोलीस, वनपरिक्षेत्र, दुय्यम निबंधक, सहकार, परिवहन, पोस्ट आणि आरोग्य विभाग अशा विविध खात्यांचा सक्रिय सहभाग या शिबिरात राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांच्या सेवांबद्दलची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
आरोग्य विभागाकडून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ तसेच ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत आरोग्य कार्ड काढणे, वयाचा दाखला, रक्तदाब, हिमोग्लोबिन, उंची-वजन, विविध तपासण्या यांसह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या निमित्ताने विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी गावपातळीवर उपस्थित राहणार असून, प्रशासन नागरिकांच्या दारी येणार आहे. त्यामुळे ‘समाधान शिबिर’ हे गावकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार असल्याचे चित्र आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडल अधिकारी विजय फलके यांनी केले आहे.


