शिरूर : प्रतिनिधी
वनपरिमंडळ अधिकारी कार्यालय, शिरूर यांच्या वतीने शनिवार (दि. २१ मार्च २०२६) रोजी ‘वन अग्निमुक्त दिन’ साजरा करण्यात येणार असून, यानिमित्ताने शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता श्री रामलिंग देवस्थान सभागृह, पाबळ रोड , रामलिंग (शिरूर) येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी वन सीमेवरील सर्व गावांतील ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सामूहिक शपथविधी कार्यक्रम होणार आहे.
वनपरिमंडळ अधिकारी श्री. भानुदास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वने ही पाणी, माती, हवामान व वन्यजीव यांचे संतुलन राखून मानवी जीवनाचे संरक्षण करतात. मात्र, वनवणव्यामुळे काही क्षणांत मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा शपथविधी केवळ औपचारिक न राहता भावी पिढ्यांसाठी वनसंवर्धनाचे सामूहिक वचन ठरावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
वनवणवे रोखण्यासाठी जनजागृती निर्माण करणे, वना प्रती कर्तव्याची भावना रुजवणे आणि प्रत्येकाने स्वतःहून पुढाकार घेऊन इतरांनाही प्रेरित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


