शिरूर | प्रतिनिधी
टाकळी हाजी परिसरात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होत असलेल्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या जाचक वीज कपातीविरोधात ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले.
महावितरणकडून १८ मार्च २०२६ पासून नवीन वीजपुरवठा वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार सायंकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
सायंकाळची वेळ ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाची असताना अंधारामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच घरगुती कामांच्या वेळेत वीज नसल्याने महिलांना अंधारात काम करावे लागत आहे. दुसरीकडे, दिवसा वीजपुरवठा नसल्यामुळे शेतीची कामे ठप्प होत असून, रात्री उशिरा वीज मिळाल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतीला पाणी द्यावे लागत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सायंकाळच्या वेळेत वीज कपात केल्याने संपूर्ण गाव अंधारात जात असून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे हे लोडशेडिंग तातडीने रद्द करावे किंवा वेळेत बदल करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, आदर्श सरपंच दामुशेठ घोडे, सोसायटीचे चेअरमन बन्सीशेठ घोडे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन खामकर, शंकर थोरात आदी उपस्थित होते.
दरम्यान, टाकळी हाजी येथे शनिवारी (दि. २१) सकाळी ११ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. विकास आल्हाट यांच्या उपस्थितीत वीज तक्रार निवारण बैठक आयोजित करण्यात आली आहे. नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन शाखा कार्यालय, महावितरण टाकळी हाजी यांच्या वतीने करण्यात आले आहे.



