बिबट्यांच्या भीतीमुळे दिवसा वीजपुरवठ्याची मागणी; लोडशेडिंग वेळेत बदलाचीही मागणी
टाकळी हाजी : प्रतिनिधी
टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसर हा बिबट प्रवण क्षेत्रात येत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा तसेच सायंकाळच्या लोडशेडिंगच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाने यापूर्वी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकरी सुरक्षितपणे शेतीची कामे करू शकत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून कृषी पंपासाठी वीजपुरवठा दिवसा आणि रात्री अशा दोन शिफ्टमध्ये करण्यात येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्यांच्या भीतीखाली शेतात जावे लागत असून जीवितास धोका निर्माण झाला आहे.
तसेच, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना सायंकाळी ६ ते १० या वेळेत लोडशेडिंग होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळे येत आहेत. त्यामुळे लोडशेडिंगची वेळ बदलून विद्यार्थ्यांना सोयीची करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
गावठाण फिडर स्वतंत्र नसल्यामुळे वारंवार अडचणी येत असून, गाव व वाडीवस्त्यांसाठी स्वतंत्र लाईनचे काम सुरू आहे. या कामाला गती देण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, माजी सरपंच दामूशेठ घोडे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन खामकर, भरत खामकर, शंकर थोरात, दत्ता दिवेकर, बाळासाहेब थोरात, राहुल रसाळ, रामदास सोदक, कोंडीबा खामकर, दत्तात्रय भाकरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
गावठाण फिडरवर सायंकाळी सहा ते दहा या वेळेत वीजपुरवठा सुरू असला तरी त्याच फिडरवर कृषी पंपासाठी सिंगल फेज वीजपुरवठा असल्याने त्या वेळेत शेतीपंपांसाठी वीज बंद राहते.यामुळे त्या भागातील सिंगल फेज लाईट बंद राहते. तसेच कृषी पंपासाठी रात्रीऐवजी दिवसा वीज हवी असेल तर सहा तास थ्री फेज वीजपुरवठा देणे शक्य असल्याची माहिती सहायक अभियंता नितीन मुरकुटे यांनी दिली.


