शिरूर, दि. १८ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील दहिवडी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. मांजरेवस्ती येथे १२ वर्षीय साईराज गणेश मांजरे याचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह उसाच्या फडात आढळल्याने संपूर्ण परिसरात भीती, संताप आणि संशयाचे गडद सावट पसरले आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ही केवळ दुर्घटना नसून काहीतरी गंभीर रहस्य दडले आहे का, असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साईराज हा तळेगाव ढमढेरे येथील राय कुमार गुजर प्रशालेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला साईराज मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेत असतानाच सायंकाळी पाचच्या सुमारास दादाभाऊ मांजरे यांच्या विहिरीजवळील उसाच्या शेतात त्याचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा प्रकार समोर येताच गावात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा ठाम संशय व्यक्त केला. मुलाला विहिरीत बुडवून मारण्यात आल्याचा आरोप करत, गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळीच गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.
या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे २१ जून २०२४ रोजी याच परिसरात ११ वर्षीय यश शरद गायकवाड याचाही मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळला होता. त्या वेळीही मृत्यूबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले होते. आता पुन्हा तशाच पद्धतीची घटना घडल्याने या दोन घटनांमध्ये काही साम्य आहे का, याबाबत संशय अधिकच गडद झाला आहे.
दरम्यान, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपरतन गायकवाड, वनपरीक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुरावे संकलनाचे काम सुरू आहे. घटनास्थळाची बारकाईने तपासणी करण्यात येत असून, प्रत्येक शक्यता तपासली जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या सलग दोन घटनांमुळे दहिवडी परिसरातील पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, “दोन वर्षांत दोन चिमुकल्यांचे संशयास्पद मृत्यू… ही केवळ योगायोगाची बाब आहे की यामागे एखादे काळे गूढ दडले आहे?” असा सवाल उपस्थित होत असून, या दोन्ही प्रकरणांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

