·शिरूर, दि. २२ (अरुणकुमार मोटे) :
शिरूर शहरातील मार्वल कम्फर्ट (सुरज) लॉजिंगच्या खोलीत २० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) आढळून आल्याच्या कारवाईनंतर अंमली पदार्थांच्या व्यवहारासह आता लॉज व्यवस्थापनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असली, तरी लॉज मालक अथवा व्यवस्थापनाला कधी आरोपी करणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अंतरावर हे ठिकाण असून येथे अनेक दिवसांपासून य हे अवैध धंदे या लॉजिंग मधून चालत होते.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली मग शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस नक्की काय करतात. शिरूर पोलिसांची भूमिका यात संशयास्पद असल्याची चर्चा सुरू शिरूरकरांमध्ये होत आहे
लॉज मालकाची भूमिका तपासण्याची मागणी
लॉजच्या खोलीचा वापर अंमली पदार्थांच्या व्यवहारासाठी होत असल्याचे तपासात समोर आले असल्यास, त्या खोलीची बुकिंग कोणी केली, ग्राहकांची ओळख कशी तपासली, लॉजच्या रजिस्टरमध्ये कोणती नोंद आहे, सीसीटीव्हीमध्ये कोणत्या व्यक्तींची ये-जा दिसते, तसेच व्यवस्थापनाला या प्रकाराची माहिती होती का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
केवळ खोलीतून अंमली पदार्थ जप्त करून दोन व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी या व्यवहारामागील संपूर्ण साखळी उघड करण्याची गरज आहे. त्यामुळे लॉज मालक किंवा व्यवस्थापनाची भूमिका निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, या प्रकरणात लॉज मालकाचे नाव कारवाईतून वगळण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्यामार्फत १५ लाख रुपयांची आर्थिक तडजोड झाल्याची चर्चा शिरूर शहरात सुरू आहे. तरी अशा गंभीर चर्चेमुळे पोलिसांच्या तपासाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.
संबंधित पोलिस कर्मचारी कोण, त्याची या प्रकरणातील भूमिका काय, तसेच पैशांची देवाणघेवाण झाली का, याची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
‘कारवाईच्या सावलीत कोणाला अभय?’
अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. मात्र, कारवाईदरम्यान एखाद्या व्यक्तीला आर्थिक तडजोडीतून अभय मिळाले असेल, तर हा प्रकार त्याहून गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
‘एमडी विक्रीसाठी लॉजची खोली वापरली गेली असेल, तर त्या खोलीचा मालक, व्यवस्थापक अथवा संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार की नाही? आणि १५ लाख रुपयांच्या तडजोडीची चर्चा खोटी की खरी, हे पोलिस प्रशासन स्पष्ट करणार कधी?’ असे प्रश्न आता शिरूरकर उपस्थित करीत आहेत.
एमडीचा पुरवठा कुठून झाला, तो कोणाकडून खरेदी करण्यात आला, शहरात त्याचे वितरण कोण करीत आहे, या व्यवहारामागे आणखी कोण व्यक्ती आहेत, आरोपींचे आर्थिक व्यवहार कोणाशी झाले, तसेच लॉजचा या संपूर्ण नेटवर्कमध्ये नेमका वापर कसा झाला, याचा तपास करण्याची मागणी होत आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ दोन आरोपींपुरता मर्यादित न ठेवता लॉज व्यवस्थापन, अंमली पदार्थांचा पुरवठादार, स्थानिक वितरक, आर्थिक व्यवहार आणि संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची कथित भूमिका या सर्व बाबींची चौकशी करण्याची गरज आहे.
एमडी प्रकरणात आरोपी जेरबंद झाले; आता लॉज मालकाची भूमिका कधी निश्चित होणार आणि ‘१५ लाखांच्या तडजोडी’ची चर्चा करणाऱ्या अथवा त्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी कधी होणार, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.( कमशः )

