जांबूत | ( प्रफुल्ल बोंबे) ,दि. २३
शिरूर – आंबेगाव तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यात आणि विशेषतः बेट भागातील गावांच्या दळणवळणाला चालना मिळावी म्हणून राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून गायमुख –अवसरी – शिक्रापूर या मार्गासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांचेकडून सुमारे ४१६ कोटींचा निधी कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी मंजूर करण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली खरी; मात्र अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या या कामात असंख्य त्रुटी दिसत असून या कामाबाबत काठापूर खुर्द , पिंपरखेड , जांबूत, शरदवाडी , वडनेर खुर्द आदि गावांतील ग्रामस्थांनी मोठी नाराज दाखवत संताप व्यक्त केला आहे. मात्र विविध वृत्तपत्रातून अनेकदा वृत्त प्रसिध्द होऊनही संबंधित रस्ते प्रशासन आणि ठेकेदार यांना पाझर फुटत नसल्याचे दिसून येते.
शिरूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील काठापूर खुर्द ते टाकळी हाजी या परिसरात संबंधित ठेकेदाराने अनेक पुलांचे खोदकाम करून ठेवले खरे; मात्र संबंधित खोदकाम करून अपूर्ण ठेवलेल्या पुलाच्या कामामुळे अनेक छोटे – मोठे अपघात घडत असून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. मात्र संबंधित पुलाच्या बाजूने संरक्षणार्थ लावण्यात आलेले पत्रे देखील वादळात पडून गेल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही परिणामी एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक शालेय विद्यार्थी , दुग्ध उत्पादक शेतकरी आणि नागरिक या रस्त्याने ये जा करत असतात .सदरच्या पुलांवर कित्येक शालेय विद्यार्थी आणि नागरिक यांचे अपघात झाल्याच्या घटना घडून गेल्या आहेत. झोपेचे सोंग घेतलेल्या रस्ते प्रशासन आणि ठेकेदार यांना या परिस्थितीचे गांभीर्य राहिले नसून याबाबत उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा केली असता अधिकारी , ठेकेदार आणि आणि काम चालू असलेल्या ठिकाणी नियुक्त केलेले कर्मचारी हे संपर्काच्या बाहेर असून ग्रामस्थांचे फोन उचलत नसल्याच्या तक्रारी असून सदर ठिकाणी एखादी घटना घडल्यास त्यास संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना जबाबदार धरण्यात येईल असेही ग्रामस्थांनी सांगितले.
अनेकदा वृत्त प्रसिद्ध करून ढिम्म झालेल्या या यंत्रणेच्या विरोधात पुढील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे लेखी तक्रार करणार असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. याबाबत उद्भवलेली संपूर्ण परिस्थिती मांडणार असून कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करावी आणि संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बंपलवार यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचेकडून फोन स्विकारण्यात आला नाही.
रस्त्याच्या कामामुळे घडत असलेल्या अपघातांच्या बाबतीत जर सदरचे अधिकारी आणि ठेकेदार यांना गांभीर्य नसेल तर पुढील आठवड्यात त्यांच्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेकडे लेखी तक्रार करून संबंधित माहिती देण्यात येईल. आणि पुढील आठ ते दहा दिवसांत उपाययोजना करण्यात आली नाही तर रस्ते प्रशासन व अधिकारी यांच्याविरोधात पंचतळे (ता.शिरूर) येथील मुख्य चौकात बेल्हे-जेजुरी राज्यमार्ग अडवून आंदोलन उभे करू – शंकर पिंगळे , सामाजिक कार्यकर्ते


