शिरूरमध्ये वडिलोपार्जित जमीन लुबाडण्यासाठी बनावट दस्तऐवजांचा मोठा कट उघड
शिरूर दि. १८ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील पारोडी येथील वडिलोपार्जित शेतजमीन बळकावण्यासाठी तब्बल सहा दशकांपूर्वीच्या एकत्रिकरण नोंदींमध्ये छेडछाड करून बनावट जबाब, खोट्या सह्या व शिक्के तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात एकूण १३ जण आरोपी आहेत.
विशेष म्हणजे या कथित कटात येळे कुटुंबातील सदस्यांसह उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरूर येथील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप असल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी पोपट गंगाराम येळे (वय ४८, रा. पारोडी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवतक्रार म्हाळुंगी येथील गट नं. १६ ही जमीन त्यांच्या आजोबा कृष्णा ऊर्फ किसन तात्या येळे यांच्या नावावर सन १९५७ च्या वाटपानुसार व १९६४-६५मधील एकत्रिकरण योजनेनुसार वैधरीत्या नोंदलेली होती. संबंधित जमिनीवर १९६६ ६७पासून सातत्याने ७ / १२ उताऱ्यावर फिर्यादी कुटुंबाचे नाव नोंदलेले होते. बँक कर्ज, वारस फेरफार व इतर अधिकृत नोंदींमधूनही हा हक्क निर्विवाद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, आरोपींनी संगनमत करून गट नं. १६ बाबत दि. १०जानेवारी १९६७ रोजीचा तथाकथित जबाब बनावटरीत्या तयार केल्याचा आरोप आहे. या खोट्या जबाबावर मयत कृष्णा तात्या येळे यांचा खोटा अंगठा उमटवण्यात आला असून पंच म्हणून दगडू बाबुराव पाटील यांची बनावट सही, तसेच सहाय्यक एकत्रिकरण अधिकारी ( ८३, पुणे) यांची खोटी सही व शिक्के लावण्यात आल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. हा बनावट दस्तऐवज नंतर जिल्हा न्यायालय पुणे येथील अपिल क्र. ३३९/ २०२२ मध्ये खरा पुरावा म्हणून सादर करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे…1) सोपान विष्णू येळे (वय 78), 2) निवृत्ती विष्णू येळे (67), 3) चिंतामण विष्णू येळे (65), 4) सुदाम विष्णू येळे (60), 5) पांडुरंग विष्णू येळे (57), 6) अमोल चिंतामण येळे (45), 7) दिलीप निवृत्ती येळे (48), 8) अविनाश ऊर्फ बापू चिंतामण येळे (38), 9) प्रविण निवृत्ती येळे (37), 10) विशाल ऊर्फ बाबू पांडुरंग येळे (29), सर्व रा. येळेवस्ती, पारोडी, ता. शिरूर. तसेच 11) श्रीमती बेबीनंदा जयचंद्र शिंदे (शिपाई), 12) विनोद व्यंकटेश सूर्यवंशी (अभिलेखपाल) आणि 13) संतोष नामदेव काळाणे (परिरक्षण भूमापन) हे तिघेही उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय, शिरूर येथे कार्यरत कर्मचारी आहेत.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, भूमी अभिलेख कार्यालयातील मूळ एकत्रिकरण कागदपत्रे, खाते उतारे व जबाब पुस्तिकेतील पाने आरोपींनी संगनमताने नष्ट केली. या संदर्भात माहिती मागविल्यानंतर कार्यालयाने दि. ३१ जुलै २०२३ रोजी संबंधित जबाब अभिलेखात उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांचा संशय अधिक बळावला आहे.
या प्रकरणाची दखल घेत घोडनदी येथील ज्युडिशियल मजिस्ट्रेट (वर्ग- ०१) यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६(३) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत करीत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे हे मार्गदर्शन करीत आहेत.
जमीन व्यवहारांमध्ये शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांचे संगनमत, बनावट दस्तऐवज आणि न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा हा अत्यंत गंभीर प्रकार असून, या प्रकरणातील तपासातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिरूर भूमी अभिलेख कार्यालयातील अजून काही दस्ताऐवजांमध्ये काही फेरफार केला असल्याची दाट शक्यता नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.

