शिरूर दि. १७ ( अरुणकुमार मोटे) | शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे सामायिक शेतजमिनीच्या खाजगी मोजणीवरून काका–पुतण्यात वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर जालिंदर इचके (वय ६५, व्यवसाय शेती, रा. कवठे यमाई) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कवठे येमाई गावच्या हद्दीतील सामायिक शेतजमीन गट क्रमांक ९९९ ची खाजगी मोजणी सुरू असताना हा प्रकार घडला.
खाजगी मोजणीस पुतण्या वसंत कारभारी इचके याने विरोध दर्शवित शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी “मोजणी मान्य नसेल तर सरकारी मोजणी करून घ्या” असे सांगितल्याचा राग मनात धरून आरोपी वसंत इचके याने चिडून काठीने फिर्यादीच्या डाव्या पायाच्या नडगीवर मारून दुखापत केल्याचा आरोप आहे. तसेच धक्काबुक्की, शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.याचवेळी आरोपीची मुले अमोल वसंत इचके व समीर वसंत इचके हे दोघे हातात काठ्या घेऊन घटनास्थळी धावून आले व “रानातून बाहेर निघा” अशी धमकी देत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार अरुण उबाळे हे करीत आहे. सामायिक जमिनीच्या वादातून वाढत चाललेल्या हाणामारीच्या अशा घटनांमुळे ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


