टाकळी हाजी : प्रतिनिधी
राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील थोरात परिवारातील सून श्रद्धा अक्षय थोरात यांची मंडळ कृषि अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण पार्श्वभूमीतून येत श्रद्धा यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. विवाहानंतर अनेकदा मुलींच्या शिक्षणात खंड पडतो; मात्र थोरात कुटुंबाने याला अपवाद ठरवत श्रद्धा यांना पूर्ण पाठबळ दिले. शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत त्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ दिला नाही.
श्रद्धा थोरात यांच्या यशामुळे टाकळी हाजी परिसरातील मुलींना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



