शिरूर | मलठण (ता. शिरूर) गावच्या हद्दीत अष्टविनायक महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. रविवारी (दि. १) रात्री सुमारे पावणेनऊच्या सुमारास स्नेहल हॉटेलसमोर ही दुर्घटना घडली. अपघातानंतर कार घटनास्थळी सोडून चालकाने पलायन केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या अपघातात अजय बाळू देवकर (वय २८, रा. कवठे येमाई) आणि किरण अर्जुन चोरे (वय २४, रा. डोंगरगण, चोरेवस्ती) यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सुरेश मारुती चोरे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मलठण बाजूकडून कवठे येमाईच्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी एर्टिगा कारच्या (क्र. एमएच ०३ ईएफ ६५५९) चालकाने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून येणाऱ्या होंडा युनिकॉर्न दुचाकीला कारची जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालकाने जखमींना वैद्यकीय मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता कार घटनास्थळीच सोडून पळ काढला.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कारचालकाचा पोलीस शोध घेत असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटिंग करीत आहेत.


