शिरूर दि.१९ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील रांजणगाव परिसरात बी.सी. मंडळाच्या नावाखाली नागरिकांकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा करून आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिस ठाण्यात मुख्य सुत्रधार सुलभा नवलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी बारकू चंदर सोनवणे (वय ४५, व्यवसाय शिक्षक, रा. स. नं. ४७/५, लेन नं. ८, नवीन साईबाबा मंदिराजवळ, चंदननगर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. रांजणगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३८५/२०२६ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ तसेच The Price Chit and Money Circulation Schemes (Banning) Act, 1978 मधील कलम ५ व ६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सुलभा शरद नवले, नितीन शरद नवले, सुहास शरद नवले, अजितविन नितीन नवले आणि प्रतिभा सुहास नवले यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
पोलिस नोंदीनुसार, आरोपींनी बी.सी. मंडळ नोंदणीकृत असल्याचे भासवून बेकायदेशीरपणे ते चालविले. या माध्यमातून फिर्यादीसह एकूण ३९ व्यक्तींकडून पैसे जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. बी.सी.मध्ये भरणा करण्यासाठी वेळोवेळी स्वतःची तसेच अन्य व्यक्तींची बँक खाती वापरण्यास सांगून ऑनलाइन व रोख स्वरूपात मोठी रक्कम स्वीकारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या व्यवहारातून एकूण २० कोटी ३४ लाख ६५ हजार ४०० रुपयांची रक्कम जमा करून तिचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ३९ व्यक्तींची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
१८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.०६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास रांजणगाव पोलिस करीत असून, नेमकी किती रक्कम कोणाकडून जमा करण्यात आली, बँक खात्यांमधून किती व्यवहार झाले आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास होण्याची शक्यता आहे.
शिरूर तालुक्यातून बड्या राजकीय नेते,नागरिकांसह, अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पैसे या बि.शी.मध्ये गुंतवल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. अनधिकृत बी.शी.मध्ये पैसे गुंतवल्याने वरीष्ठ कारवाई करतील या भितीने पोलिसांना गुन्हा दाखल करता येत नव्हता. नागरिकांनी लेखी तक्रार केल्याने तपास होऊन गुन्हा दाखल केल्याने या आरोपींना गजाआड करण्यात आले असून पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहे.

