- शिरूर दि.१४ ( अरुणकुमार मोटे )
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे लग्नाचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय महिलेवर गेल्या दोन वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अत्याचाराला विरोध केल्यावर संबंधित महिलेला हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी नंदू आनंदा बरडे (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) याला शुक्रवारी (दि. १४) रात्री अटक केली.
याबाबत पीडित महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टाकळी हाजी येथील पोलीस चौकीच्या पाठीमागे असलेल्या तिच्या राहत्या घरी गेल्या दोन वर्षांपासून ते १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपीने पीडितेला मारहाण करून दुखापत केली तसेच, ‘माझ्याविरुद्ध कुठे तक्रार केली तर तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे पीडित महिला भयभीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ६४, ६४(२)(m), ११८(१), ११५(२), ३५१(२)(३) व ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला शिरूर पोलिसांनी १४ ऑगस्ट रोजी रात्री ८.४५ वाजता अटक केली आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत हे करीत आहेत.

