शिरूर दि. ११ ( अरुणकुमार मोटे):
शिरूर शहरातील बाबुरावनगर येथील कोळपे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेदरम्यान २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याच्या घटनेने
कोळपे हॉस्पिटलच्या उपचार पद्धतीवर मोठे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पूजा राहुल गई (वय २८, रा. रांजणगाव गणपती, मूळ रा. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी उपचारपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, “हाताच्या फ्रॅक्चरचे ऑपरेशन होते, मग अचानक मृत्यू कसा झाला?” असा संतप्त सवाल पती राहुल गई यांनी उपस्थित केला आहे.
पूजा यांना ४ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून पडल्याने उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. तपासणीनंतर फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले आणि शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. ६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता शस्त्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तासांतच परिस्थिती गंभीर बनली आणि दुपारी सुमारे २ वाजता पूजा यांच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांना देण्यात आली.
या घटनेने नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शस्त्रक्रियेदरम्यान नेमके काय घडले? रुग्णाची प्रकृती अचानक का बिघडली? भूल देताना काही गुंतागुंत निर्माण झाली होती का? आपत्कालीन परिस्थितीत कोणते उपचार करण्यात आले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता कुटुंबीय मागत आहेत.
‘कारवाई कधी होणार?’
पूजा यांच्या मृत्यूनंतर काही नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी संबंधित डॉक्टरांच्या उपचारपद्धतीबाबत यापूर्वीही रुग्णांकडून तक्रारी ऐकू येत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करून त्या खऱ्या आहेत की निराधार, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी पुढे येत आहे.
“या डॉक्टरांबाबत अनेक रुग्णांच्या तक्रारी असल्याचे आम्ही ऐकतो. आता एका तरुण महिलेचा ऑपरेशनदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची केवळ औपचारिक चौकशी न करता संपूर्ण वैद्यकीय उपचारांची तपासणी झाली पाहिजे. दोष आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलिस तपास आणि शवविच्छेदन निर्णायक
या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्याने मृतदेह पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र, पूजा यांच्या मृत्यूमागे वैद्यकीय निष्काळजीपणा होता, भूलप्रक्रियेदरम्यान काही गुंतागुंत झाली होती की अन्य कोणते वैद्यकीय कारण होते, याबाबत सध्या अधिकृत निष्कर्ष उपलब्ध नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय कागदपत्रे, उपचाराची नोंद आणि तज्ज्ञ वैद्यकीय तपासणी यावरच पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे.
दरम्यान, कोळपे हॉस्पिटल अथवा संबंधित डॉक्टरांविरोधात यापूर्वी ज्या-ज्या रुग्णांनी तक्रारी केल्या असतील, त्या तक्रारींचीही संबंधित आरोग्य विभागाने चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. तक्रारी केवळ चर्चेपुरत्या आहेत की त्यामध्ये तथ्य आहे, हे अधिकृत चौकशीतून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
‘पूजाला न्याय मिळणार का?’
हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या तरुण विवाहितेचा काही तासांत मृत्यू झाल्याने कुटुंबीयांसह नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः पूजा यांच्या कुटुंबाची परिस्थितीही बिकट असल्याचे नातेवाईक सांगतात. “पूजा यांच्या मृत्यूचे खरे कारण काय?”, “शस्त्रक्रियेदरम्यान नेमके काय घडले?”, “उपचारात काही त्रुटी झाल्या का?”, “आणि दोष आढळल्यास संबंधित डॉक्टरांवर कारवाई कधी होणार?” हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.
आरोपांपेक्षा सत्य महत्त्वाचे; मात्र सत्य दडपले जाऊ नये, यासाठी पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे. शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय तपासणीतून पूजा यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊन दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईल का, याकडे आता शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

