
शिरूर, दि. २६ ( अरुणकुमार मोटे):
शिरूर तालुक्यातील जांबूत गावाच्या हद्दीतील एका विहिरीत सुमारे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मयत प्रमाणे नोंद करण्यात आली असून, मृताची ओळख पटविण्याचे आवाहन शिरूर पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्षे असून त्याने अंगात काळ्या रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट आणि कमरेला राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केलेली आहे. ट्रॅक पॅन्टच्या उजव्या खिशावर “Shiv-Naresh” असे इंग्रजीत लिहिलेले आहे.
सध्या मृताची ओळख पटलेली नसून, अशा वर्णनाची व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी तात्काळ शिरूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद खटींग करीत असून, मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी विविध माध्यमांतून माहिती प्रसारित करण्यात येत आहे.

