
शिरूर, दि. २६ (अरुणकुमार मोटे):
शिरूर पोलिस ठाण्याचा पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी चार्ज घेतल्यानंतर गेल्या महिन्यांत गंभीर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वारंवार दुचाकी चोरी, सोनसाखळी चोरी, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, घरफोडी तसेच विद्युत रोहीत्र चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात असून, या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या कार्यकाळातील गुन्हेगारी परिस्थितीची चर्चा सुरू झाली आहे.
विशेषतः गेल्या महिनाभरात सात दुचाकी चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्याने वाहनचोरांनी पोलिसांनाच खुले आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेक घटनांमध्ये अद्याप आरोपींचा शोध लागलेला नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
शहरासह ग्रामीण भागात भरदिवसा घरफोडी च्या घटना घडत असल्याने व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोल पंप, मेडिकल, सोसायटी पार्किंग आणि सार्वजनिक ठिकाणांहून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटनांमुळे पोलिसांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, गुन्हेगारांचा वाढता धाडस आणि सलग घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे पोलिसांनी गस्त, गुप्त माहिती संकलन आणि गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
पोलीस अधीक्षकांनी शिरूर तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीचा स्वतंत्र आढावा घ्यावा, प्रलंबित गुन्ह्यांचा वेगाने छडा लावण्यासाठी विशेष तपास पथके नियुक्त करावीत, रात्रीची गस्त वाढवावी आणि वाहनचोर तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्ह्यांचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र, वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना लवकरात लवकर ठोस परिणाम दिसावेत, अन्यथा पुन्हा एकदा नागरिकांना कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आंदोलन -उपोषण करावे लागतील.

