
भाग-१ | शिरूर डिजिटल विशेष
शिरूर, दि. २२ (अरुणकुमार मोटे):
राज्य शासनाने महसूल विभागाला पारदर्शक, गतिमान आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कितीही नियमावली लागू केली, ऑनलाइन सेवा सुरू केल्या आणि नागरिकांना वेळेत सेवा देण्याच्या सूचना दिल्या, तरी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी मंडळ कार्यालयात मात्र परिस्थिती याच्या अगदी उलट असल्याचा आरोप नागरिक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे. येथे शेतकऱ्यांच्या कामांपेक्षा हेलपाट्यांनाच अधिक महत्त्व दिले जात असून, “भेट नाही तर नोंद नाही… पैसे दिल्याशिवाय कामच नाही?” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
मंडळ अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या कामकाजाबाबत गेल्या काही महिन्यांपासून असंतोष वाढत असून, सातबारा दुरुस्ती, फेरफार, वारस नोंद, पीकपाणी, महसुली अहवाल यांसारख्या अत्यावश्यक कामांसाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असल्याची तक्रार आहे. अनेकदा अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतात, तर कधी “आज या, उद्या या” अशी उत्तरे देऊन नागरिकांना परत पाठविले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, काही नागरिकांनी महसुली कामे जलद मार्गी लावण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करत असून, महसूल यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
टाकळी हाजी मंडळ कार्यालयात नेमके काय सुरू आहे? शासनाच्या आदेशांना येथे केराची टोपली दाखवली जात आहे का? नागरिकांच्या तक्रारींकडे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत आहेत का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून, कार्यालयातील सर्व प्रलंबित कामांची तपासणी करावी. आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. टाकळी हाजी बेटात या .सर्कल ‘पोट ‘कुले ने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लुट केली असुन फोन पे वर सुद्धा पैसे घेतले आहेत. त्याचीही चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊन त्याचे पोट नक्की कधी भरणार ? वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर वेळीच कारवाई करणार का ? त्याच्यावर कारवाई न झाल्यास गावोगावचे प्रतिनिधी मंत्रालयात जाऊन महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल करून दाद मागणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांनी दिली आहे.
क्रमशः…

