शिरूर, दि. २२ (अरुणकुमार मोटे):
शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा दुपारी एक वाजता झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य शेतीच्या कामासाठी शेतात गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत आत प्रवेश केला आणि कपाट फोडून तब्बल १७ तोळे सोन्याचे दागिने, अंदाजे ८ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता बाळासाहेब पडवळ (वय ५२, रा. संविदणे, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २१ जुलै रोजी सकाळी कुटुंबातील सर्वजण शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. दुपारी सुमारे दोनच्या सुमारास मुलगा अजय घराकडे मोटार बंद करण्यासाठी गेला असता, घराच्या मुख्य दरवाज्यावरील कुलूप संशयास्पदरीत्या तुटलेले दिसले. त्याने ही माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर सर्वजण तातडीने घरी आले.
घरात प्रवेश करून पाहिले असता, बेडरूममधील लाकडी व लोखंडी कपाटे फोडलेली होती. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले होते. संपूर्ण घराची पाहणी केल्यानंतर कपाटात ठेवलेले मौल्यवान सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये साडेतीन तोळ्यांचे गंठण, विविध प्रकारची मंगळसूत्रे, सोन्याची चैन, पुरुष व महिलांच्या अंगठ्या, कानातील दागिने, कर्णफुले अशा एकूण १७ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असून त्यांची अंदाजे किंमत ८ लाख ५० हजार रुपये इतकी आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांची हालचाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्यात ग्रामीण भागात घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दिवसाढवळ्या घरफोडी करण्याचे धाडस चोरट्यांनी दाखवल्याने पोलिसांनी रात्रीबरोबरच दिवसा देखील गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भागवत हे करीत आहे.

