
शिक्रापूर, दि. १२ ( अरुणकुमार मोटे)
पोलीस म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी नसून, संकटात धावून जाणारे माणुसकीचे खरे रक्षकही आहेत, याचा प्रत्यय शिक्रापूर येथे नुकताच आला. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे एका तीन वर्षीय निष्पाप बालिकेचे संभाव्य मोठे संकट टळले असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
घटना शिक्रापूर येथील चाकण चौक परिसरात रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. एक व्यक्ती तीन वर्षांच्या बालिकेला सोबत घेऊन अत्यंत मद्यधुंद अवस्थेत रस्त्यालगत पडलेली असल्याचे स्थानिक नागरिक विनोद जाधव, राजू दान आणि राधेश्याम आहेर यांच्या निदर्शनास आले. चिमुकली भयभीत अवस्थेत असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना माहिती दिली.
माहिती मिळताच मिलिंद देवरे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रथम घाबरलेल्या बालिकेला सुरक्षितपणे जवळ घेत तिला धीर दिला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीच्या खिशात असलेल्या कागदपत्रांमधून मोबाईल क्रमांक शोधून कुटुंबीयांशी संपर्क साधला. काही वेळातच नातेवाईक घटनास्थळी पोहोचल्यानंतर सर्व खात्री करून बालिकेला त्यांच्या सुरक्षित ताब्यात देण्यात आले.
वेळीच केलेल्या या संवेदनशील हस्तक्षेपामुळे एका निष्पाप बालिकेच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता टळली. आपल्या मुलीला सुखरूप पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांनी भावना व्यक्त करत, “मिलिंद देवरे हे आमच्यासाठी केवळ पोलीस नाहीत, तर साक्षात पांडुरंग आहेत,” असे सांगत त्यांचे मनापासून आभार मानले.
या घटनेमुळे खाकी वर्दीमागील माणुसकीचा चेहरा पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे. कायद्याचे पालन करताना समाजातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची आणि संवेदनांची जपणूक करणारे पोलीसच समाजाचा खरा आधार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीमुळे शिरूर तालुक्यात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा कर्तव्यदक्ष पोलिसांना नागरिकांनी सलाम केला आहे.

