- टाकळी हाजी पोलिसांच्या आशीर्वाद
शिरूर, दि. १८ (अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील बेट भागात अवैध धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच धाब्यांवर देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे मलठण परिसरात दिवसा ढवळ्या जुगाराचा फड सुरू असल्याची चर्चा असून, पोलीस प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंचायत समिती शिरूर येथे झालेल्या ( दि. १७ रोजी ) बैठकीत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र त्या आदेशानंतरही बेट भागातील अनेक गावांमध्ये अवैध व्यवसाय सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आली का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
मलठणसह परिसरातील काही गावांमध्ये जुगार अड्डे सुरू असल्याचा आरोप होत असून हातभट्टी दारू, ताडी आणि अवैध मद्यविक्रीही बिनधास्तपणे सुरू असल्याची चर्चा आहे. धाब्यांवर रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री होत असल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याची चिंता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, संबंधित बीट अधिकाऱ्यांची कार्यपद्धतीही चर्चेचा विषय ठरत आहे. “अवैध धंदे सुरू असताना पोलीस नेमके काय करत आहेत?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
बेट भागातील अवैध धंद्यांविरोधात तातडीने धडक मोहीम राबवून जुगार अड्डे, हातभट्टी दारूचे अड्डे आणि अवैध मद्यविक्री केंद्रांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
चौकट
“आदेश झाले, पण कारवाई कधी?”
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतरही बेट भागात जुगार, ताडी व अवैध दारू विक्री सुरू असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे आदेश आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी असल्याचे चित्र समोर येत असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी आता याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

