शिरूर, दि. ११ (अरुणकुमार मोटे)
शिरूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर अपघात प्रकरणात पोलिसांनी अपघातानंतर चालक बदलल्याचा धक्कादायक आरोप समोर आला असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३३/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार गंभीर अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर काही जण गंभीर जखमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या अपघातात प्रत्यक्ष वाहन चालवणारा चालक आणि नंतर गुन्हा दाखल करताना आधिकार्याने आर्थिक तडजोड करून चालक वेगळाच दाखवण्यात आला आहे. अपघातानंतर चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसल्याने त्याला वाचवण्यासाठी ‘ड्रायव्हर ’ बदलण्यात आला असल्याची सुत्रांची माहीती आहे.
अपघातावेळी वाहन कोण चालवत होते, घटनास्थळी नेमकी परिस्थिती काय होती, तसेच नंतर चालक बदलण्यामागे कोणाचा सहभाग होता, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचीही चर्चा असून, त्याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, अपघातात एका निष्पाप बालकाचा जीव गेला असल्याने प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले आहे. त्यामुळे कोणालाही अभय न देता सत्य बाहेर आणावे आणि दोषींना कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या अपघात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, शिरूर पोलिस या आरोपांची कितपत दखल घेतात आणि चौकशीची दिशा काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर चालक बदलल्याचा आरोप खरा ठरला, तर केवळ अपघातच नव्हे तर पुरावे लपविण्याचा गंभीर गुन्हाही समोर येऊ शकतो.
“अपघातातील सत्य दडपले जाणार नाही ना?” हा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, पोलिसांच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ( क्रमशः )

