वरूडेतील थरारक खूनप्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत उलगडा
शिरूर. १०( अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील वरूडे गावात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या खळबळजनक खूनप्रकरणाचा शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत छडा लावत आरोपीला गजाआड केले आहे. घराबाहेरील ओट्यावर झोपलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात गावातीलच एका अल्पवयीन मुलाने जुन्या भांडणाचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
या घटनेमुळे वरूडे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीपर्यंत मजल मारत गुन्ह्याचा उलगडा केल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
उकाड्यामुळे घराबाहेर झोपणे ठरले जीवावर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासो बबन तांबे (वय ४३, रा. रानमळा, वरूडे, ता. शिरूर) हे ८ जून रोजी रात्री उकाडा होत असल्याने घराबाहेरील ओट्यावर झोपले होते. रात्री सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेल्या तांबे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मयताचे भाऊ प्रकाश बबन तांबे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाला गती दिली. शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) यांना समांतर तपासाचे आदेश देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत तांत्रिक आणि मानवी माहितीच्या आधारे तपास सुरू केला. मयताच्या पूर्वीच्या वादांची, वैमनस्याची आणि संपर्कातील व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात आली. त्यातून संशयाची दिशा गावातीलच एका अल्पवयीन मुलाकडे वळली.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
सुमारे दोन वर्षांपूर्वी मयत बाळासो तांबे आणि संबंधित अल्पवयीन मुलामध्ये वाद झाला होता. त्या भांडणाचा राग मुलाच्या मनात कायम होता. त्यातच आठ दिवसांपूर्वी बाळासो तांबे यांनी त्याला रस्त्यात अडवून शिवीगाळ केली व मारहाणीची धमकी दिल्याचे समोर आले. या घटनेमुळे अल्पवयीन मुलाच्या मनात सूडाची भावना अधिक तीव्र झाली.
८ जूनच्या रात्री बाळासो तांबे घराबाहेर झोपल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्याने पूर्वनियोजित पद्धतीने धारदार लोखंडी कोयता घेऊन घटनास्थळी जाऊन झोपेत असलेल्या तांबे यांच्या गळ्यावर वार केले. गंभीर स्वरूपाच्या जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुन्हा करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.
पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या सांगण्यावरून खुनासाठी वापरण्यात आलेला लोखंडी कोयता जप्त केला आहे. तसेच गुन्ह्याशी संबंधित इतर पुरावेही संकलित करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सलग प्रयत्न केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे वेगाने फिरविण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार सोमनाथ कचरे व पोलीस कॉन्स्टेबल सुजित जगताप करीत आहेत.
अल्पवयीन मुलाकडून जुन्या वैमनस्यातून एवढे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर वरूडे गावासह परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

