
शिरूर, दि. १० (अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील फाकटे,चांडोह, टाकळी हाजी,वडनेर, म्हसे सरदवाडी, माळवाडी या गावांमध्ये महावितरणकडून वारंवार करण्यात येणाऱ्या वीज कपातीविरोधात या गावातील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांच्या मागदर्शनाखाली एकत्र येत मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेत बिबट्यांचा गंभीर प्रश्न त्यात रात्रीची विज कपात या समस्यांचा पाढा वाचून रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करण्याची लेखी मागणी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून नागरिकांच्या अडचणींची सविस्तर माहिती प्रशासनापुढे मांडण्यात आली.
फाकटे व परिसरातील गावांमध्ये विशेषतः रात्रीच्या वेळेस वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा, पिकांची देखभाल आणि अन्य कामे करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या परिसरात बिबट्या व सर्पांचा वावर असल्याने रात्रीच्या अंधारात नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्यामुळे रस्ते, शेतमळे आणि वस्ती परिसर अंधारात बुडत असून अपघात तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी सांगितले की, यापूर्वी अनेक वेळा महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रारी आणि निवेदने देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने अखेर फाकटे,टाकळी हाजी व परिसरातील ग्रामस्थ, सरपंच, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला.
यावेळी दिलेल्या निवेदनात फाकटे व पंचक्रोशीतील गावांमधील रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करावे, नियमित व अखंडित वीजपुरवठा करावा तसेच नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, दि. १० रोजी शिष्टमंडळाने बारामती येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांची भेट घेतली. बेट भागातील ग्रामस्थांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करून लहागमे यांनी विभागाला आवश्यक सूचना देवून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते शंकर पिंगळे यांनी सांगितले आहे. प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होऊन परिसरातील नागरिकांची लोडशेडिंगच्या समस्येतून सुटका होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

