शिरूर, दि. ८ ( अरुणकुमार मोटे):
सोशल मीडियावरून ओळख वाढवत एका अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपी साहील दगडू शेख (रा. ठिकेकरवाडी, ता. जुन्नर) याच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. ऑक्टोबर २०२४ मध्ये आरोपीने तरुणीला आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर परिसरात भेटण्यासाठी बोलावले. तेथे तिचे फोटो व व्हिडीओ काढून पुढे ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तरुणीला वारंवार भेटण्यासाठी बोलावले. शिरूर परिसरातील एका निर्जन ठिकाणी तसेच जुन्नर तालुक्यातील त्याच्या राहत्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने घरातील तलवार दाखवून धमकावल्याचाही आरोप आहे.
दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये आरोपीने तरुणीला पारनेर तालुक्यातील म्हसे येथे तसेच इतर ठिकाणी नेले. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांकडून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पुढे जानेवारी २०२६ मध्ये दिल्ली येथे नेऊन कथितरित्या विवाहाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मात्र त्यानंतर मुस्लिम धर्म स्वीकारून निकाह करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तसेच आरोपीने तरुणीच्या घरातील सुमारे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र घेतल्याचा आरोप असून, त्याच्या कुटुंबीयांनीही धर्मांतरासाठी मानसिक व शारीरिक दबाव टाकल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. विरोध केल्यास फोटो व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी साहील दगडू शेख, युनूस पठाण (पूर्ण नाव माहिती नाही), साहीलची आत्या व चुलती (नावे माहिती नाहीत) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एम), ८७, ३०५, ३५१(२)(३), ३(५) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू असून प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

