शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नांसाठी प्रभावी कामाचा निर्धार
निघोज | कुकडी प्रकल्प डावा कालवा वितरिका स्तरीय पाणीवापर संस्था महासंघ, नारायणगावच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी नवनिर्वाचित कार्यकारिणीची घोषणा व सत्कार समारंभ अहिल्यानगर जिल्ह्यातील निघोज ( ता.पारनेर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. घोड व कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती सदस्य प्रकाश वायसे यांच्या अध्यक्षतेखाली व अमृता रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विविध पदांवरील निवडी जाहीर करण्यात आल्या.
महासंघाच्या अध्यक्षपदी दिलीप मदगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी प्रकाश वायसे, उपाध्यक्षपदी पांडुरंग ढवळे, तर कार्यकारी संचालकपदी रविंद्र शिंदे व रघुनाथ निचित यांची निवड करण्यात आली.
संचालक मंडळात चंद्रकांत लामखडे, अमोल कातोरे, संपतराव पानमंद, अमृता रसाळ, बाळासाहेब शिंदे, रामभाऊ शेळके, साहेबराव लोखंडे, सुभाष शेटे यांची निवड झाली. तज्ज्ञ संचालकपदी प्रविण गायकवाड तर सचिवपदी अरुण सोमवंशी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी बोलताना कार्याध्यक्ष प्रकाश वायसे यांनी शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महासंघ कटिबद्ध असल्याचे सांगितले. पाणीपट्टी वसुली, परतावे वेळेत करणे, संस्थांचे नियमित आर्थिक लेखापरीक्षण, कालवा व चाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे, तसेच सर्व पाणीवापर संस्थांना न्याय्य पाणीवाटप करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जलसिंचन योजनांचा प्रसार करून पाण्याची बचत आणि कार्यक्षम वापरासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा पुणे-नगर जिल्ह्यातील सामाजिक चळवळीचे अभ्यासू नेतृत्व दत्ताजी उणवणे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या निवडीचे कौतुक केले. तसेच नव्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत शेतकरी व समाजहिताच्या प्रश्नांवर प्रभावीपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.


