शिरूर दि.१८ ( अरुणकुमार मोटे)
शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी परिसरात पिंपरी चिंचवड गुन्हे विरोधी पोलिस पथकावर झालेल्या धाडसी गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, या गंभीर प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम उभारली आहे. अनेक तासांच्या शोधमोहीमेनंतरही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नसल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाला सराईत गुन्हेगारांच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर संबंधित संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास सोनेसांगवीजवळील परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पोलिसांनी पाठलाग सुरू केला असता आरोपींकडून अचानक पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही खबरदारीचा उपाय म्हणून हवेत चार राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले.
या घटनेत एका संशयिताविरोधात गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, पोलिसांवर हल्ला तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा विविध स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे ग्रामीण, पिंपरी-चिंचवड तसेच स्थानिक पोलिसांची संयुक्त पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील सर्व शेतांची,रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली.
रविवारी दिवसभर ड्रोन, स्थानिक खबर्यांचे जाळे, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता. शेतमळे, ऊसाचे फड, ओढ्याकाठचा परिसर आणि दुर्गम वस्त्यांमध्ये पोलिसांनी कसून शोधमोहीम राबवली.
या धाडसी घटनेमुळे सोनेसांगवी व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संबंधित पोलिस यंत्रणेकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

