शिरूर | दिघी येथील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींनी पोलिसांच्या पाठलागादरम्यान पोलिसांवरच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी सोनेसांगवी (ता. शिरूर) परिसरात घडली. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र, आरोपी दाट झाडी व उसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शोधमोहीम सुरू होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दिघी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी रांजणगाव गणपती येथील शेळके वस्ती परिसरात असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे विशेष पथक आरोपींच्या मागावर होते. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून (क्र.एमएच १२ डब्ल्यूजी ५१८५) सोनेसांगवीच्या दिशेने पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनीही वाहनातून त्यांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, दुचाकी रस्त्यातच बंद पडली, आरोपींनी दुचाकी सोडून थेट पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनीही तत्काळ प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र, आरोपी उसाच्या शेतात पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक तसेच शिरूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात तातडीने नाकेबंदी करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली. पोलिसांनी शेत परिसर, झाडी तसेच गावलगतच्या रस्त्यांवर कसून तपासणी सुरू ठेवली होती. मात्र उशिरापर्यंत गोळीबार करणाऱ्यांचा नेमका ठावठिकाणा लागू शकला नाही.


